तपासणीमुळे खदान, क्रेशरधारकांचे धाबे दणाणले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:15 AM2021-08-02T04:15:37+5:302021-08-02T04:15:37+5:30
वाशिम : गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारीवरून खदान, क्रेशरची तपासणी मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली ...
वाशिम : गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारीवरून खदान, क्रेशरची तपासणी मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी ११ ठिकाणी तपासणी झाल्याने खदान, क्रेशरधारकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी ठोस कारवाई होणे आणि तपासणी मोहिमेत सातत्य ठेवावे, असा सूर तक्रारदारांसह नागरिकांमधून उमटत आहे.
जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवित तपासणीची मोहीम हाती घेतली. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील जिल्हास्तरीय भरारी पथकाने वाशिम तालुक्यातील तोंडगाव, तामसाळा व हिस्से बोराळा येथील ११ खदान, क्रेशरची अचानक तपासणी केली. यामुळे खदान, क्रेशरधारकांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यात सर्वत्रच ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तपासणी झाल्यानंतर नियमाचा भंग झाल्याचे निदर्शनात आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी स्पष्ट केले. पहिल्या दिवशी तपासणी केलेल्या ११ प्रकरणांत नेमकी काय कारवाई होणार, याकडे तक्रारदारांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
०००००
या बाबींची होणार तपासणी
परवाना दिनांकापासून आतापर्यंत किती प्रमाणात उत्खनन केले आहे, उत्खननाच्या अनुषंगाने स्वामित्वधनाचा किती भरणा केला आहे तसेच ईटीएस मशीनद्वारे खदानीची मोजणी झाली असल्यास त्याची प्रत व ब्लास्टिंग ज्या व्यक्तीमार्फत करण्यात येते, त्या व्यक्तीच्या परवान्याची प्रत मागितली जाणार आहे.
०००००००
औपचारिकता म्हणून मोहीम नको !
गौण खनिजाचे अवैध उत्खननप्रकरणी खदान व क्रेशरची तपासणी सुरू करण्यात आली. तपासणी मोहिमेत सातत्य असायला हवे तसेच केवळ औपचारिकता म्हणून तपासणी मोहीम नको, असा सूर तक्रारदारांसह नागरिकांमधून उमटत आहे.