ग्रामसभेला कोलदांडा देणाऱ्यां पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:32 IST2018-09-28T15:25:31+5:302018-09-28T15:32:52+5:30
पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेण्यात आले.

ग्रामसभेला कोलदांडा देणाऱ्यां पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
पार्डी ताड: मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे नियमित ग्रामसभा होत नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतकडून गटविकास अधिकाºयांकडे करण्यात येत होत्या. या संदर्भात लोकमतने ६ सप्टेंबर रोजी पार्डी ताड येथे वर्षभरापासून ग्रामसभाच नाही. या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेण्यात आले.
पार्डी येथील ग्रामपंचायतच्या सचिवांनी आॅगस्ट २०१७ मध्ये प्रभार घेतल्यापासून ग्रामसभेचे आयोजन केले नाही, तसेच ते गावात नियमित येत नाहीत. मासिकसभेलाही उपस्थित राहत नाहीत. ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका वर्षात २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन करणे आवश्यक असताना वर्षभरात एकही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळेच गावात तंटामूक्ती अध्यक्षाची निवड होऊ शकली नाही, अशा प्रकारची तक्रार ग्रामस्थांच्यावतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे करण्यात आली होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून पंचायत समितीचे लक्ष वेधले असता. गटविकास अधिकाºयांनी विस्तार अधिकारी पद्मने यांच्यामार्फत २५ सप्टेंबर रोजी या प्रकाराची चौकशी करीत ग्रामपंचायत सरपंच व्ही. आर. लांभाडे, ग्रामसचिव पी. एस. मनवर, तसेच पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे यांचे बयाण नोंदविले.
सरपंच, सचिव आणि ग्रामस्थांच्या बयाणात विरोधाभास
पार्डी ताड येथील ग्रामसभेबाबत केलेल्या चौकशीदरम्यान विस्तार अधिकाºयांनी ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेतले. त्यामध्ये विरोधाभास दिसून आला. सचिवांनी १५ आॅगस्ट रोजी त्यांच्याकडे चांभईचा प्रभार असल्याने पार्डी ताड येथे सभा घेतली नसल्याचे; परंतु २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा घेतल्याचे नमूद केले, तर सरपंचांनीही २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा झाल्याचे नमूद केले, तर पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे या तिन्ही ग्रामस्थांनी २३ आॅगस्ट रोजी ग्रामसभा झालीच नसल्याचे बयाणात नममद केले आहे. विशेष म्हणजे या तिघांची हजेरी पटावर स्वाक्षरी असली तरी, त्यातील दोघांनी ती आपली स्वाक्षरी नसल्याचे नमूद केले आहे.