चार महिन्यांपासून ४0 गावांतील विद्युत पुरवठा अनियमित
By admin | Published: October 22, 2015 01:40 AM2015-10-22T01:40:28+5:302015-10-22T01:40:28+5:30
वाशिम जिल्ह्यातील परिस्थिती; शेतकरी त्रस्त.
किनखेडा (जि. वाशिम) : मसलापेन व मांगुळ झनक विद्युत उपकेंद्राला वीजपुरवठा करणार्या लाइनचा (विजेचा) खांब किनखेडा शिवारात चार महिन्यांपासून वाकलेल्या अवस्थेत आहे; मात्र वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष आहे. ४0 गावांना वीजपुरवठा करणारे दोन उपकेंद्र असून, त्या उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा या मोडलेल्या खांबामुळे विस्कळीत होत आहे. ४0 गावांतील कृषिपंपाचा वापर विजेअभावी प्रभावित झाला आहे. मागील चार महिन्यांपासून याबाबत शेतकर्यांनी सहायक अभियंता, वरिष्ठ अभियंता यांना वारंवार सूचित करूनही अद्यापपर्यंंत सदर खांब बदललेला नाही. लाइन ही खांबावर नसून, खांब लाइनच्या आधारे आडवा झालेला आहे. त्यामुळे ३३ केव्ही विद्युत प्रवाह हा केवळ १0 फुटांवर आलेला आहे. त्याखालून श्री सिद्धेश्वर संस्थानकडे जाणारा रस्ता असून, शेतशिवारात या रस्त्याने जावे लागते. १0 फूट उंचीचे वाहन सदर रस्त्यावरून नेता येत नाही. सदर वाकलेल्या खांबामुळे एखादी दुर्घटना घडल्यास कोणास जबाबदार धरावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तात्काळ मोडलेला खांब बदलून इतर खांबदेखील सरळ करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.