काजळेश्वर परिसरात अनियमित वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:23+5:302021-07-05T04:25:23+5:30
वाशिम : परिसरातील इतर काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे भाजीपाला पिकांचे सिंचन प्रभावित ...
वाशिम : परिसरातील इतर काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे भाजीपाला पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने शेतकरी, तर घरातील पंखे बंद राहत असल्याने डासांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
----------------
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : मानोरा तालुक्यातील साखरडोहसह परिसरातील काही गावांत कृषी विभागामार्फत कीड नियंत्रण आणि तण व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
-------------------
उंबर्डा बाजार परिसरातील नाले तुडुंब
उंबर्डा बाजार : यावर्षी जून महिन्यात सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडल्याने उंबर्डा बाजार परिसरातील जलस्रोतांची पातळी वाढली आहे. त्यात परिसरातील नाले तुडुंब भरले असून, गुरांना पिण्यासाठी या पाण्याचा आधार झाला आहे.
--------------
खरडलेल्या जमिनीचे अहवाल प्रलंबित
वाशिम : भर जहाँगीर येथून जवळच चाकोलीसह परिसरात दोन दिवस जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतजमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी अंतिम अहवाल अद्यापही वरिष्ठस्तरावर तयार झालेले नाहीत.
----------
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून मानोरा तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी गुरुवारी करण्यात आली.
^^^^^^^^^^^^^^
रस्त्यावरील गटारामुळे अपघाताची भीती
उंबर्डा बाजार : उंबर्डा बाजार-जांब या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत असल्याचे गुरुवारी दिसले. यामुळे करताना नियंत्रण सुटल्यास अपघात घडण्याची भीती आहे.
^^^^^^^
जांभरूण शिवारात पेरणीला सुरुवात
वाशिम : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे काही भागांतील पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यात वाशिम तालुक्यातील जांभरूण महालीसह कोंडाळा महाली व परिसरातील गावांचा समावेश होता. आता पावसाने उघाड दिल्याने या भागांतील पेरणीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.