शिरपूर येथे अनियमित वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:20+5:302021-07-18T04:29:20+5:30
अनियमित वीजपुरवठ्यामुळे व्यापारी, बँक, विविध कार्यालयातील सेवा प्रभावित होत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीज कार्यालयाला घेराव घालण्यात येईल ...
अनियमित वीजपुरवठ्यामुळे व्यापारी, बँक, विविध कार्यालयातील सेवा प्रभावित होत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीज कार्यालयाला घेराव घालण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने वीज वितरण कंपनीला देण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीमध्ये वाशिम जिल्ह्यात सर्वात चांगली सेवा देण्यासाठी शिरपूर वीज वितरण कार्यालयाचा नावलौकिक होता, मात्र गत एक, दीड महिन्यापासून दिवसभरात दहा ते पंधरावेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा मोठा परिणाम विविध व्यवसायासह, बँक, पोस्ट ऑफिस, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सेवेवर सुद्धा होत आहे तसेच रात्री बेरात्री खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिकांच्या वतीने शिरपूर येथील वीज वितरण कंपनीला वीजपुरवठा खंडित स्वरुपाचा न करता सुरळीत व नियमित करावा. सोमवार १९ जुलैपर्यंत वीजपुरवठा सुरळीत व नियमित न झाल्यास मंगळवार २० जुलै रोजी शिरपूर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाला व अधिकाऱ्याला घेराव घालण्यात येईल, असे निवेदन १६ जुलै रोजी शिरपूर येथील सहायक अभियंता यांना दिले. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संदीप देशमुख, किशोर देशमुख, अमोल शंकरराव देशमुख, अमोल भास्करराव देशमुख,बाळू प्रल्हादराव देशमुख, भीमराव देशमुख,रवि देशमुख, विठ्ठल देशमुख, रमजान रेघीवाले, कैलास भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची प्रत वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आली .