मालेगाव तालुक्यात शिशू आहार वाटपात गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 02:18 PM2019-07-20T14:18:43+5:302019-07-20T14:18:54+5:30
मालेगाव तालुक्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बालकांना हा आहार मिळालाच नसल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : अंगणवाडीतील तीन वर्षाखालील बालकांचे कुपोषण होऊ नये म्हणून वर्षांतील ३०० दिवस रोज ३०० उष्मांक आहाराची शासनाने तरतूद केली; परंतु मालेगाव तालुक्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बालकांना हा आहार मिळालाच नसल्याची माहिती आहे. त्यामुळ तालुक्यात या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे दिसत आहे.
मालेगाव तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत १८० अंगणवाड्या आहेत. तालुक्यातील अंगणवाड्यांना महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटीव्ह कन्झूमर्स फेडरेशन लि . मुंबई यांनी मे आणि जून या दोन महिन्यातील ५० दिवसासाठी अंगणवाडीनिहाय कच्च्या धान्याचा पुरवठा केला. यामध्ये मसूर डाळ, मूग डाळ, मिरची, हळद, सोयाबीन तेल, चवळी, मटकी आदी धान्यांचा समावेश आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांतर्गत येणाºया सहा महिने ते ३ वर्षांपर्यंतच्या लाभार्थी बालकांना या धान्याचे वितरण अपेक्षीत होते; परंतु शेकडो लाभार्थी बालकाच्या घरापर्यंत हे धान्य पोहोचलेच नाही. काही अंगणवाडी केंद्रात बालक कमी असतानाही तेथील सर्व बालकांना शिशू आहार मिळाला नाही. बहुतांश पालकांना तर या पोषण आहाराची थोडीही कल्पना नाही. तथापि, लाभार्थी बालकांना धान्य वितरण केल्याची नोंद कागदोपत्री करण्यात आली आहे. अनेक बालकांना हा आहार मिळाला नाही तर, काहींना अर्धाच आहार वाटप केल्याची माहिती आहे.
शासनाकडून कुपोषण मुक्तीसाठी विविध योजना राबविण्यात येत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे लाभार्थींपर्यत त्या योजनाच पोहोचत नाहीत. यामुळे शासनाच्या योजनेचा उद्देश असफल ठरत आहे.
त्यामुळे मालेगाव तालुक्यातील मे आणि जून या दोन महिन्यातील शिशू आहार वितरणाची सखोल चौकशी केल्यास पालकांच्या भेटी घेतल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असून, पोषण आहाराची चौकशी करण्याची मागणी पाककवर्गाकडून होत आहे.
प्रभारी अधिकाºयांच्या अनुपस्थितीचा परिणाम
मालेगाव येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने मंगरुळपीर येथील बालविकास प्रकल्प अधिकाºयांकडे मालेगावचा प्रभार देण्यात आला होता; परंतु सदर अधिकारी या ठिकाणी ठरल्यानुसार उपस्थित राहत नव्हते. त्याबाबत वरिष्ठस्तरावर तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीमुळे पोषण आहार वितरणात गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त होत आहे. तथापि, या प्रकाराच्या चौकशीनंतरच वास्तव समोर येऊ शकणार आहे. दरम्यान, आता मंगरुळपीरच्या अधिकाºयांकडून येथील प्रभार काढून स्थानिक विस्तार अधिकारी अनिल उलेमाले यांच्याकडे बालविकास प्रकल्प अधिकाºयांचा प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे.
मालेगाव तालुक्यात शिशू पोषण आहार वितरणात गैरप्रकार झाला असेल किंवा लाभार्थींना नियमानुसार आहार वितरण झाले नसेल, तर त्याची चौकशी करून. संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल.
-मदन नायक
प्र. महिला व बालकल्याण अधिकारी
जि.प. वाशिम
आमच्या येथील मुलांना नियमानुसार अंगणवाडीतून पोषण आहार मिळत नाही. मागील महिन्यात सर्व साहित्याचे केवळ एक पाकिट मिळाले आहे. याबाबत संबंधित अधिकारीही काही बोलण्यास तयार नसतात. त्यामुळे मनता संभ्रम निर्माण झाला आहे.
-शंकर अहिर (पालक)
मालेगाव