‘पैनगंगे’त मुबलक जलसाठा असूनही विजेअभावी सिंचन अशक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 01:52 PM2020-02-09T13:52:32+5:302020-02-09T13:52:43+5:30
विजेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’ची उपयोगिता शून्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपये खर्चून ‘बॅरेजेस’ उभारण्यात आले. हे काम पूर्ण होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. तथापि, बॅरेजेसमुळे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असले तरी विजेची सोय अद्यापपर्यंत उपलब्ध न झाल्याने पाण्याचा वापर होणे अशक्य झाले आहे.
जिल्ह्यात सिंचनाचा असलेला अनुशेष दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवर वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ची कामे करण्यात आली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. सन २०१६ च्या अखेर बॅरेजेसची कामे पूर्ण झाली. तेव्हापासूनच खºयाअर्थाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाकरिता नदीतील पाण्याचा वापर करता येणे क्रमप्राप्त होते; परंतु विजेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’ची उपयोगिता शून्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.
हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ३८ कोटींचा निधी उपलब्ध देखील करून दिला. त्यातून ९ उपकेंद्र निर्माण केली जात आहेत; मात्र ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून आगामी अनेक महिने ते पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे.
(प्रतिनिधी)