शेकडो हेक्टर सिंचन करणारा प्रकल्प कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 06:01 PM2019-04-28T18:01:46+5:302019-04-28T18:02:40+5:30
प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जवळपास २० वर्षांपूर्वी सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जि.प. लघूसिंचन विभागाकडून प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. याचा फायदा शेकडो शेतकºयांना झाला; परंतु दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असतानाच या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे. आता या प्रकल्पातील गाळाचा तातडीने उपसा करून खोली वाढविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
शासनाच्यावतीने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेकडो योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी हजारो कोटींचा निधीही उपलब्ध केला; परंतु अस्तित्वात असलेल्या साधनांकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नव्या योजनांचा शेतकºयांना फायदा होत नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रकल्पातील गाळाचा उपसा झालेला नाही. आधीच अवर्षणाचे प्रमाण वाढल्याने प्रकल्पांत पुरेसा जलसंचय होत नाही. त्यात गाळ साचल्याने खोली कमीही झाली आहे. अशातही या प्रकल्पांतून गाळाचा वारेमाप उपसा होत नाही. पाणी उपशावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. नियोजनाची अमलबजावणीही कागदोपत्रीच राहते. त्यामुळे प्रकल्प हिवाळ्यांतच तळ गाठतात. अशीच स्थिती मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथील प्रकल्पाची झाली आहे. २० वर्षांच्यापूर्वी उभारलेल्या या प्रकल्पावर शेकडो हेक्टर सिंचन केले जाते. तथापि, या प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रासह साठवण क्षेत्रात मोठा गाळ साचला असून, झुडपांचे साम्राज्यही पसरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची साठवण क्षमता खूप कमी झाली असून, शेतकºयांना आता या प्रकल्पाचा पूर्वीसारखा फायदा होत नाही. हा प्रकल्पाने यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तळ गाठला आणि आता हा प्रकल्प पूर्ण कोरडा पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानातून या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून त्याची खोली वाढवावी, अशी मागणी या प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी करीत आहेत.