पशूगणनेचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 03:00 PM2019-11-19T15:00:31+5:302019-11-19T15:00:37+5:30
नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.
वाशिम : राज्यात २० व्या पशूगणनेचे काम आधीच विलंबाने हाती घेण्यात आले. त्यातच विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात जवळपास एक वर्ष निघून गेले. आता राज्यातील जिल्हानिहाय नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.
राज्यात दुध देणारी तसेच भाकड जनावरांची संख्या नेमकी किती आहे, कोणत्या वंशाच्या जनावरांचे प्रमाण कमी होत आहे किंवा वाढत आहे, याबाबत जाणून घेऊन त्याआधारे पशुसंवर्धनासाठी योजनांचे नियोजन करता येणे शक्य असते. त्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. त्यानुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर ती पाच वर्षांनंतर अर्थात २०१७ मध्ये होणे आवश्यक होते; मात्र विविध स्वरूपातील अडचणी व शासकीय उदासिनतेमुळे २० वी पशुगणना जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये ठराविक प्रगणक नेमून त्यांना टॅब पुरविण्यात आले. यामाध्यमातून गोळा होणारी दैनंदिन माहिती साठविण्याकरिता दिल्लीत मुख्य सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली; परंतु सर्व्हर डाऊन राहणे, दुर्गम भागात इंटरनेटची गती कमी असणे यासह इतर अडचणींमुळे पशूगणना पूर्ण करण्यास तब्बल ११ महिने लागले. दरम्यान, प्रगणकांनी गोळा केलेली सर्व माहिती वरिष्ठांकडे सादर केली असून त्याआधारे राज्यभरातील सर्व प्रकारच्या जनावरांची अद्ययावत माहिती मिळणे क्रमप्राप्त आहे. असे असताना हा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही.
प्रगणकांकडून पशुधनासंबंधी गोळा करण्यात आलेली माहिती आणि पशुधन असलेल्या घरांची पुर्नसर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करून तसे अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आहे. शासनस्तरावरूनच आता पशुधनाचा नेमका आकडा जाहीर होईल.
- गणेश पवार
पशुधन विकास अधिकारी, वाशिम