रद्द पदभरतीचे २९३ रुपये परीक्षा शुल्क परत द्यायला लागले ४ वर्ष; शासनाचा अजब कारभार 

By सुनील काकडे | Published: December 8, 2023 06:33 PM2023-12-08T18:33:01+5:302023-12-08T18:33:53+5:30

२०१९ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती  प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

It took 4 years to refund Rs 293 examination fee of canceled recruitment Strange administration of the government | रद्द पदभरतीचे २९३ रुपये परीक्षा शुल्क परत द्यायला लागले ४ वर्ष; शासनाचा अजब कारभार 

रद्द पदभरतीचे २९३ रुपये परीक्षा शुल्क परत द्यायला लागले ४ वर्ष; शासनाचा अजब कारभार 

वाशिम : २०१९ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती  प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; मात्र काही कारणास्तव ती ऐनवेळी रद्द झाली. त्यामुळे उमेदवारांनी भरलेले परीक्षा शुल्क तात्काळ परत मिळणे अपेक्षित असताना प्रति उमेदवार केवळ २९३ रुपये परीक्षा शुल्क परत करायला शासनाला तब्बल ४ वर्षे लागली. २७८५ उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची ८ लक्ष १६ हजार २५० रुपये रक्कम वाशिमच्या स्टेट बॅंकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात आल्याचे सबंधित यंत्रणेकडून कळविण्यात आले.

उच्चशिक्षण घेवूनही शासकीय सेवेत नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. एखादवेळी पदभरती निघाल्यास रितसर ऑनलाईन अर्ज आणि त्यासोबत परीक्षा शुल्काचा डी.डी. जोडल्याशिवाय पुढची प्रक्रियाच होवू शकत नाही. महत्प्रयास करूनही नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरती प्रक्रियेत ३ हजार १२३ उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. रितसर अर्ज करून संबंधितांनी परीक्षा शुल्काचा डी.डी. अर्जासोबत जोडून प्रक्रिया पूर्ण केली; मात्र ऐनवेळी परीक्षाच रद्द झाल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला. दरम्यान, शासनाकडे डी.डी.द्वारे जमा झालेली परीक्षा शुल्काची रक्कम तेव्हाच उमेदवारांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा व्हायला हवी होती; मात्र हा प्रश्न तब्बल ४ वर्षे रेंगाळत राहिला. आताही ३ हजार १२३ उमेदवारांपैकी पडताळणी केलेल्या २ हजार ७८५ उमेदवारांचे २९३ रुपयांप्रमाणे ८ लक्ष १६ हजार २५० रुपयांचा धनादेश स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या वाशिम शाखेकडे पाठविण्यात आला आहे.

Web Title: It took 4 years to refund Rs 293 examination fee of canceled recruitment Strange administration of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.