विवाहितेची आत्महत्या नव्हे, पतीनेच आवळला होता गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:17 PM2020-12-26T12:17:21+5:302020-12-26T12:20:42+5:30
Women Murderd News आरोपी पतीनेच तिची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु.: येथून जवळच असलेल्या विळेगाव येथे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना २१ डिसेंबरच्या रात्री घडली होती. याप्रकरणी मृतक महिलेच्या पित्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीला अटक करीत चौकशी केली असता महिलेने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. आरोपी पतीनेच तिची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे.
याप्रकरणी धनज पोलिसांनी आरोपी पती श्याम भगवान गिरी यास ताब्यात घेऊन २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पोलीस पीसीआरवर ठेवण्यात आले आहे.
विळेगाव येथील सानिया उर्फ रुखमा श्याम गिरी या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
त्यावेळी मृतक विवाहितेच्या पित्याने आपल्या मुलीस माहेरहून ३० हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसांत केली होती. यावरून धनज बु. पोलिसांनी आरोपी पती श्याम भगवान गिरी याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
यात घटनास्थळी विवाहितेने आत्महत्या केल्याचा कोणताच पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी श्याम गिरी याची कसून चौकशी केली असता. आपणच सानियाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी श्याम गिरीवर कलम ३०४ ब, ४९८ अ, ३०२, २१० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आधी आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आल्यामुळे विळेगावसह कारंजा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.