दहा लाख बँकेत भरणारे आयटीच्या रडारवर
By admin | Published: January 12, 2017 02:19 AM2017-01-12T02:19:49+5:302017-01-12T02:19:49+5:30
दोन अधिकार्यांची नेमणूक केली असून, उत्पन्नाच्या स्रोताची चौकशी होणार आहे.
संजय खांडेकर
अकोला, दि. ११- नोटाबंदीनंतर जुन्या, हजार-पाचशेच्या नोटा, दहा लाखांच्यावर बँक खात्यात जमा करणारे सर्व आयटीच्या रडारवर आहेत. अकोल्यातही शेकडोंच्या संख्येत असे खातेदार समोर आल्याने त्यांची चौकशी लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. आयकर विभागाने अकोल्यातीलच दोन अधिकार्यांना या कारवाईसाठी विशेष अधिकार प्रदान करीत त्यांची नेमणूक केली आहे.
हजार-पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्यात. पेट्रोल पंप आणि मेडिकल स्टोअर्सवर काही दिवस या जुन्या नोटा स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. काळा पैसा ठेवणार्या अनेकांनी यादरम्यान विविध उपाययोजना केल्यात. दरम्यान, शासनाने पन्नास दिवसांची मुदत संपुष्टात आणली. त्यानंतर कोंडी झाल्याने लोकांनी आपल्या आणि नातेवाइकांच्या बँक खात्यात मोठय़ा रकमा जमा केल्यात. अकोल्यातूनही उद्योजक, अधिकारी आणि व्यावसायिकांनी आपल्या बँक खात्यात हजार-पाचशेच्या जुन्या नोटांचा भरणा केला. मोठय़ा रकमा बँक खात्यात जमा झाल्याने संशयित ठरलेल्या या मोठय़ा खात्यांची यादी बँकांच्या मुख्य शाखेतून रिझर्व्ह बँकेला गेली आहे. त्या आधारावरून आता वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आली आहे. दहा लाखांच्यावर ज्यांनी बँकेत रकमेचा भरणा केला. त्यांच्या फर्मची आणि आवकचे मूळ स्रोत तपासण्याचे काम या अधिकार्यांकडे आहे. वेळप्रसंगी छापे टाकून माहिती काढण्याचे अधिकारही या दोन अधिकार्यांना देण्यात आले आहेत; मात्र याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. अकोला आयकर विभागात मनुष्यबळ कमी असल्याने सेवानवृत्त आयटी अधिकार्यांची मदतही मिळविली जात असल्याचे समजते. मध्यंतरी अकोल्यातील तीन नामांकित बँकांची चौकशी सक्त वसुली संचालनालये (इन्फोर्समेंड डायरेक्टरेट) केली. ईडीच्या चार अधिकार्यांनी ही अकोल्यातील बँकांची झाडाझडती घेतल्यानंतर आता आयटीने चौकशीचे शस्त्र उपसले. यासंदर्भात आयकर विभागाच्या अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाइल क्रमांक अनेक बँकांत वारंवार आढळणारे खातेही वाद्यांत सापडले आहे.