‘जानगीर महाराज की जय’ चा गजराने दुमदुमले शिरपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 04:16 PM2020-02-23T16:16:42+5:302020-02-23T16:16:47+5:30
शोभायात्रेत एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर केवळ भाविकांची रिघ दिसत होती.
लोकमत न्युज नेटवर्क
शिरपूर जैन ़(वाशिम): येथे आयोजित महाशिवरात्री उत्सवाचा समारोप २३ फेबु्रवारीला भक्तीमय वातावरणात करण्यात आला. यानिमित्त गावातून पालखी शोभायात्रा काढण्यात आली. विदर्भ व मराठवाड्यातील शेकडो दिंड्याचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर केवळ भाविकांची रिघ दिसत होती. यावेळी भाविकांच्या तोंडून निघालेल्या ‘जानगीर महाराज की जय’च्या जयघोषाने अवघे शिरपूर दुमदुमले होते.
दरवर्षी प्रमाणे शिरपूर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १५ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या उत्सवानिमित्त जानगीर महाराज संस्थानमध्ये भागवत कथा, हरिकीर्तन, पारायण, काकडा आरती असे विविध धार्मिक-आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले. २२ फेब्रुवारी रोजी जानेवारी रोजी १६२ किंटल महाप्रसादाचा भंडारा पार पडला. या महाप्रसादाचा लाभ जानगीर बाबांच्या राज्यभरातील भक्तांनी घेतला. महाप्रसादानंतर दुसºया दिवशी सकाळी म्हणजे रविवार २३ फेब्रुवारीला जानगीर महाराजांची भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विदर्भ व मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. जवळपास एक किलोमीटर अंतर पालखीची रिघ होती. सकाळी पाच वाजता जानगीर महाराज संस्थानमधून निघालेली पालखी सायंकाळपर्यंत गावातून मार्गक्रमण करीत होती. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर पालखी शोभायात्रेत सहभागी भक्तांच्या मुखातून निघणाºया ‘जानगीर महाराज की जय’ या घोषणेने शिरपूर दुमदुमून गेले होते. शोभायात्रेत समाविष्ट विविध बँड पथकांनी धार्मिक गीते सादर करून भक्तीपूर्ण वातावरण तयार केले.
वारकºयांना बेसनपोळीचे भोजन
पालखी शोभायात्रा मुख्य रस्त्यावरून ईरतकर वेटाळात आल्यानंतर रहिवाशांच्यावतीने दुपारी पालखी सोहळ्यातील हजारो भाविकांना बेसन, पोळीचे भोजन देण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार जानगीर महाराज यांची पालखी शोभायात्रा हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्ग्यात नेण्यात आली. ते दर्ग्याच्या वतीने मुजाहिराच्या हस्ते पालखीचे पूजन व स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी पुन्हा जानगीर महाराज संस्थानमध्ये आल्यानंतर संस्थानचे चौथे मठाधिपती महेशगीर बाबा यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून पालखीत सहभागी भजनी दिंड्यांची बिदागिरी करण्यात आली.
चहापान व अल्पोपहाराची व्यवस्था
संत सावतामाळी मंडळ, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ भालेराव यांचे निवासस्थान, जय मल्हार युवक मंडळ, ईरतकर वेटाळात स्थानिक रहिवाशी दुपारचे भोजन, मराठा मंडळ, देशमुख युवक, श्वेतांबर जैन संस्थान, औंढा नागनाथ मंडळ आदिंनी भाविकांच्या चहापानाची व्यवस्था केली. दरम्यान, सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या जानगीर महाराज पालखी शोभायात्रे मध्येही सेवाधारी महिलांनी उत्तम भूमिका पार पाडली. सतत तीन दिवस ३०० सेवाधारी महिलांनी संस्थानच्या उत्सवासाठी अमूल्य असे योगदान दिले.