शोभायात्रेत ‘जय सेवालाल’चा गजर!
By admin | Published: July 7, 2017 01:09 AM2017-07-07T01:09:32+5:302017-07-07T01:09:32+5:30
आसेगाव (पो.स्टे.) : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्ह्यातील गुलखंड व वाटुर तांडा येथून बंजारा समाजबांधव पायदळ वारी करीत बंजारा समाजबांधवांची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दाखल होतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (पो.स्टे.) : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्ह्यातील गुलखंड व वाटुर तांडा येथून बंजारा समाजबांधव पायदळ वारी करीत बंजारा समाजबांधवांची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दाखल होतात. ६ जुलै रोजी परिसरातील धानोरा खुर्द, कासोळा येथे पायदळ वारीचे स्वागत करण्यात आले. ‘जय सेवालाल’च्या गजराने नगरी दुमदुमली होती.
जालना जिल्ह्यातील गुलखंड व वाटुर तांडा येथील बंजारा समाजबांधव दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त माता जगदंबा देवी मंदिर संस्थान पोहरादेवी येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने जातात. यावर्षी २७ जून रोजी गुलखंड व वाटुर तांडा येथून पायदळी वारी पोहरादेवी संस्थानकडे मार्गस्थ झाली. ‘जय सेवालाल’चा गजर करीत रिसोड मार्गे ही पायदळी वारी ६ जुलै रोजी आसेगाव परिसरातील ग्राम धानोरा खुर्द, कासोळा, बिटोडा भोयर, फाळेगाव, शेंदुरजना अढाव येथे पोहोचली. प्रत्येक गावात या शोभायात्रेचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. धानोरा खुर्द येथे प्राध्यापक मंगेश धानोरकर, दिनेश चव्हाण, वीरसिंग राठोड, पृथ्वीराज चव्हाण, राजूसिंग राठोड यांनी या शोभायात्रेचे स्वागत केले. ९ जुलै रोजी ही शोभायात्रा पोहरादेवी येथे पोहोचणार आहे. ५ जुलै रोजी या शोभायात्रेचा मुक्काम धानोरकर आदर्श माध्यमिक विद्यालय धानोरा खुर्द येथे होता. ६ जुलै रोजी ही शोभायात्रा पोहरादेवीकडे मार्गस्थ झाली.