जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांत १९ शिक्षक रूजू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:42 PM2017-07-30T13:42:15+5:302017-07-30T13:42:15+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तासिका तत्वावर भरण्यात आली असून, एकूण १९ शिक्षक संबंधित शाळांवर रूजू झाले आहेत.
विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा म्हणून जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिकांतर्फे शाळांची स्थापना केली जाते. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण या शाळांमधून दिले जाते. खासगी शाळांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शिक्षण दर्जेदार नसते, अशी ओरड नेहमीच होत असते. या पृष्ठभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्येही भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे या शाळांवर शिक्षकांची काही पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांवर पदोन्नती, समायोजन व आंतरजिल्हा बदली या प्रक्रियेतून शिक्षकांची पदे भरली जात आहेत. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची पदे गत सहा वर्षांपासून भरण्यात आली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वाशिम जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने तासिका तत्वावर १९ पदांना मान्यता दिल्याने शिक्षक भरतीची कार्यवाही पुर्णत्वाकडे नेण्यात आली. जिल्ह्यात वाशिम, कामरगाव व विठोली येथे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र यासह महत्त्वाच्या विषयाच्या शिक्षकांची १९ पदे तासिक तत्वावर भरण्यात आली. चार दिवसांपूर्वी सर्व शिक्षक रूजू झाल्याने तुर्तास तरी विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्रशासकीय कार्यवाही केली असून, एकूण १९ शिक्षकांची तासिका तत्वावर नियुक्ती केली आहे. सदर शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी रूजू झाले आहेत.
- अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) वाशिम.