शिरपूरात जमली राज्यभरातील जैन भाविकांची मांदियाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 03:32 PM2019-11-12T15:32:45+5:302019-11-12T15:33:06+5:30
१२ नोव्हेंबर रोजी रथयात्रा व महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर महोत्सवाची सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ स्वामी दिगंबर जैन संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ११ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या वार्षिक यात्रा महोत्सवात राज्यभरातील जैन भाविकांची अक्षरश: मांदियाळी जमल्याचे दिसून आले. १२ नोव्हेंबर रोजी रथयात्रा व महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर महोत्सवाची सांगता झाली.
शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ स्वामी दिगंबर जैन संस्थानमध्ये आयोजित वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त ११ नोव्हेंबर रोजी सकाळी बस्ती मंदिरात अभिषेक व पुजनाचा कार्यक्रम झाला. ९ वाजता ऐतिहासिक पवळी मंदिरात अभिषेक आणि पुजन, १०.३० वाजता कल्याण मंदिरात विधानाचार्य पंडित अजयभैय्या यांचा विधान कार्यक्रम, भक्ती संगीत यासह इतर कार्यक्रम पार पडले. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता संस्थानमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. ९ वाजता पंडित विजयकुमार राऊत यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. ९.३० वाजता अभिषेक पुजन करण्यात आले. त्यानंतर बस्ती मंदिरापासून पवळी मंदिरापर्यंत असंख्य जैन भाविकांच्या उपस्थितीत भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत असलेल्या बँजोच्या तालावर जैन समाजातील युवकांनी नृत्य केले. ११.३० वाजता ध्वजारोहन, चढावा बोली, अभिषेक पुजन दानदाता, विधानकर्ता, विद्वान यांच्या सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो जैन भाविकांसह पंचक्रोशीतील अन्य नागरिकांनीही घेतला. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी संस्थानच्या पदाधिकाºयांसह जैन समाजातील युवकांनी पुढाकार घेतला.