संथारा बंदीविरुद्ध जैन समाज एकवटला!
By admin | Published: August 25, 2015 02:31 AM2015-08-25T02:31:39+5:302015-08-25T02:31:39+5:30
शांततेत मूक मोर्चा काढून नोंदविला निषेध; जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रशासनाला दिले निवेदन.
वाशिम : सल्लेखना/संथारा (समाधी मरण) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली. यामुळे जैनधर्मियांच्या भावना दुखावल्या असून, न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी जिल्ह्यात सर्वत्र सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकल जैन समाजबांधवांनी मूक मोर्चा काढून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला. राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या संथारा प्रथा बंदीच्या निकालाविरुध्द सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी काढण्यात आलेला मूक मोर्चा उत्स्फूर्त ठरला. यावेळी वाशिम तालुक्यातील सकल जैन समाज बांधव, महिला भगीनी व युवतींनी मोर्चात हजेरी लावली. संपूर्ण दिवसभर सकल जैन समाजाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. मोहमायेचा त्याग करुन दिक्षा घेतल्यानंतर जैन धर्माचे आचार्य, मुनीगण, संत, साधू, साध्वी आपल्या आत्मसाधनेत रममान्य होवून जीवनाच्या अंतिम क्षणात नश्वर शरीराचासुध्दा स्वेच्छेने त्याग करुन समाधी मरण अंगीकारतात. म्हणजे यालाच संथारा, सल्लेखना, समाधी मरण म्हणतात. हा प्रकार आत्महत्येत मोडत नाही; तर आत्मसाधनेत मोडतो. मात्र, राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा, संलेखना व समाधी मरणाला आत्महत्येचे स्वरुप देवून तसा निकाल दिला. यामुळे सकल जैन समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे. याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतात २४ ऑगस्टला प्रत्येक तालुका व जिल्हाठिकाणी मुकमोर्चाचे आयोजन करुन जिल्हाधिकारी व संबंधीतांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्यांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सुध्दा निवेदने पाठविण्यात आली. सकल जैन समाजाच्या वतीने रमेशचंद बज, विनोद गडेकर, प्रविण पाटणी, केशरचंद सावके, ङ्म्रेणीक भुरे, अनिल वाल्ले, प्रविण पाटणी, मनिष संचेती, शिखरचंद बागरेचा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, सकाळी १0 वाजता नगर परिषद चौकस्थित महावीर भवन येथून मुकमोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुरुष मंडळींनी पांढरा पोषाख, महिलांनी केशरी रंगाची साडी व विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश परिधान करुन मोर्चात सहभाग नोंदविला. हा मोर्चा रमेश टॉकीज, सुभाष चौक, काटीवेश, बालुचौक, शिवाजीचौक, रविवार बाजार, पाटणी चौक, आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन चौक, बसस्थानक, तहसील कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, राजस्थान महाविद्यालयमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ठाणेदार रवींद्र देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी मोर्चादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला.