वाशिम, अकोल्यातील निराधार वृद्धांना आहार देण्यासाठी सरसावाला जळगावचा युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:21 PM2018-09-01T15:21:37+5:302018-09-01T15:26:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: व्यवसायाने शिक्षक असलेला जळगाव येथील शिक्षक विविध सामाजिक उपक्रम राबवितो. यासाठी त्याने सुरू केलेल्या निस्वार्थ जनसेवा संस्थानकडून जळगाव शहरात निराधार वृद्धांसाठी मोफत आहार पुरविण्याच्या उद्देशाने फूड बँक सुरू केली आहे. असेच कार्य वाशिम आणि अकोला जिल्ह्यात करण्याचा त्याचा प्रयत्न असून, या अंतर्गत त्याने शनिवार १ सप्टेंबर रोजी वाशिम येथे काही निराधार व्यक्तींना खाद्यपदार्थही वितरित केले आहेत.
जळगाव येथे एका खासगी शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेला २१ वर्षीय अविनाश किरण जावळे या युवकाने आपले आयुष्य समाजसेवेसाठी खर्ची घालण्याचा निर्धार केला आहे. यासाठी दरवर्षी तीन गरीब विद्यार्थीनी दत्तक घेऊन त्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च तो करतो. तसेच विविध शाळांत नियमित शालेय साहित्याचे वाटप करतो. त्याच्या या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी त्याला हातभारही लावला आणि यातूनच त्याने जळगाव येथे निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठाण ही सेवाभावी संघटना स्थापन केली आहे. या संघटनेत ४२ सदस्य असून, हे सर्व सदस्य सण, उत्सव व्यक्तीगत सजरे न करता निराधार, गोरगरीबांवर खर्च करतात. या संघटनेत शकील अहमद, अजय चौधरी, धनंजय सोनावणे, शारदा सोनवणे, धीरज जावळे, निशा पवार, मनोज पाटिल, श्रुती थेपड़े, नितिन जावळे, सतीश जावळे यांचा समावेश आहे. या संघटनेकडून आता वयाची ६० ओलांडलेल्या निराधार बेवारस वृद्धांसह दिव्यांग निराधारांना दोन वेळचे मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचे माता, पिता यांचे मार्गदर्शन आणि मोठे बंधू धीरज जावळे यांच्या संकल्पनेतून यासाठी त्यांनी एक फूड व्हॅनही जळगाव येथे सुरू केली असून, या व्हॅनच्या माध्यमातून जळगाव शहरात विविध ठिकाणी भिक्षा मागत बसणाऱ्या निराधार वयोवृद्धांना दरदिवशी सकाळ, सायंकाळचे जेवण अगदी मोफत पुरविले जाते. वाशिम येथे शनिवार असाच उपक्रम अकोला आणि वाशिम येथेही राबविण्याचा त्याचा प्रयत्न असून, या उपक्रमासाठी अकोला शहरातील ९ आणि वाशिम जिल्ह्यातील २ समाजसेवी लोकांनी प्रत्यक्ष सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
असा राबविणार उपक्रम
शहरात कोठेही लग्न समारंभ, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमानिमित्त जेवणावळीचे आयोजन केले असेल, तर त्यासाठी बनविलेले पदार्थ शिल्लक राहत असतील, ते निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठाण या संघटनेला कळविण्याचे आवाहन करण्यात येईल. त्यानुसार संघटनेची व्हॅन तेथे जाईल आणि पदार्थ खाण्यायोग्य असतील, तर ते संकलित करून निराधार वृद्ध, दिव्यांगांना शहरात वितरित करण्यात येतील. इतर दिवशी या उपक्रमात खंड पडू नये म्हणून स्वखर्चाने वृद्धांना सहजपणे पचेल, असे जेवण तयार करून वितरित करतील.त्यासाठी सर्वप्रथम खºया आणि गरजू निराधारांची माहिती संकलित करण्याचे काम तो करीत आहे.