Janta Curfue : दवाखाने, पेट्रोलपंप वगळता सर्वत्र शंभर टक्के बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 03:30 PM2020-03-22T15:30:38+5:302020-03-22T15:30:50+5:30
पेट्रोलपंप, दवाखाने, मेडिकल यासारख्या अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वत्र शंभर टक्के बंद राहिल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ अशा १४ तासांचा ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. त्यास वाशिम जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर परिसर व महामार्गाच्या कडेला असलेले पेट्रोलपंप, दवाखाने, मेडिकल यासारख्या अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वत्र शंभर टक्के बंद राहिल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा आणि मंगरूळपीर या सहाही शहरांमधील बाजारपेठ रविवारी कडेकोट बंद होती. विशेषत: जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिममध्ये रविवारचा आठवडी बाजार असतो. तो देखील रविवारी बंद ठेवण्यात आला. प्रमुख चौकांमध्ये पांढरा आणि खाकीचा पोषाख परिधान करून असलेले पोलिस कर्मचारी कर्तव्यावर हजर होते. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका ठिकठिकाणी उभ्या केल्या. त्याव्यतिरिक्त रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट जाणवून आला. पेट्रोलपंप आणि दवाखाने सुरू होते; मात्र नागरिक घराबाहेरच पडले नसल्याने गर्दी झाल्याचे कुठेही दिसून आले नाही.