Janta Curfue : वाशिम जिल्ह्यात प्रतिसाद; बाजारपेठा बंद; रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 11:49 AM2020-03-22T11:49:19+5:302020-03-22T11:49:38+5:30
सार्वजनिक स्थळे निर्जन होतीच शिवाय जिल्हाभरातील मार्गावरही शुक शुकाट दिसून आला.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २२ मार्च रोजी एक दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. या आवाहनाला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वसाहती, बाजार, मुख्य चौक, सार्वजनिक स्थळे निर्जन होतीच शिवाय जिल्हाभरातील मार्गावरही शुक शुकाट दिसून आला. यादरम्यान, सर्वच मुख्य मार्गावर पोलिसांनी सज्ज राहून दक्षता घेतल्याचेही दिसले.
जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक क्षेत्र एक दिवस बंद ठेवणे, हा प्रभावी उपाय ठरू शकतो. वैज्ञानिक दृष्टीकोणातून पाहिल्यास १४ तासांच्या कर्फ्यू विषाणू संक्रमणाच्या चक्रात एक ब्रेक ठरू शकतो. या कालावधित कोरोना विषाणूला नवे मानवी शरीर न मिळाल्यास वातावरणात पसरलेले कोरोना विषाणू नष्ट होऊ शकतात. रस्ते, कार्यालयाचे दरवाजे, रेलिंग लिफ्ट आदि आपोआपच निर्जंतूक होतील आणि अशा ठिकाणावर पडलेला विषाणू नष्ट होऊन या विषाणूच्या जीवनचक्रात बाधा निर्माण होईल आणि कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल. ही बाब लक्षात घेऊनच एक दिवस जनता कर्फ्यू पाळणे अत्यावश्यक होते. त्यासाठीच पंतप्रधानांनी जनतेला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला जिल्हाभरातील जनतेचा प्रतिसाद लाभलाच शिवाय विविध व्यवसाय क्षेत्रातही याचे काटेकोर पालन करण्यात आले. त्यामुळे नागपूर-औरंगाबाद, अमरावती-नांदेड, यवतमाळ-हिंगोली, अकोला-हिंगोली अकोला-आर्णी या महामार्गासह जिल्हाभरातील मार्गावर शुकशुकाट दिसला. यातील सर्वच मुख्य मार्गांसह शहरांतर्गतच्या मुख्य मार्गावरही पोलीस प्रशासनाने सज्ज राहून जनतेला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले.