रानभाजी महोत्सवात जय गजानन गटाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:28+5:302021-08-20T04:47:28+5:30
ग्रामीण भागातील शेतशिवारात नैसर्गिकरित्या रानभाजी व रानफळांची उगवण होते. त्यातील लाभकारक गुणधर्म शहरी भागातील नागरिकांना समजणे तसेच रानभाजीचा समावेश ...
ग्रामीण भागातील शेतशिवारात नैसर्गिकरित्या रानभाजी व रानफळांची उगवण होते. त्यातील लाभकारक गुणधर्म शहरी भागातील नागरिकांना समजणे तसेच रानभाजीचा समावेश दैनंदिन आहारात होण्याच्या दृष्टीने, रानभाजी विक्रीस कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता कृषी विभागाने १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत १५ बचतगटांनी सहभाग घेऊन ५१ प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले. दरम्यान, भेरा येथील जय गजानन महिला बचत गटाच्या महिलांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास खंडारे यांच्या १० महिलांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी तहसीलदार रवी काळे, तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरूणकर, माविम सीएमआरसी मालेगाव २ चे व्यवस्थापक प्रा. शरद व्ही. कांबळे, लेखापाल कीर्ती इंगळे, सहयोगिनी भारती चक्रनारायण, जया गायकवाड, चंद्रभागा माने, पुष्पा गवई, सुनीता सुर्वे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कृषी सहायक मानवतकर यांनी केले. कृषी पर्यवेक्षक सावंत यांनी आभार मानले.
.................................
रानभाजी विक्रीसाठी हवी बाजारपेठ
नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाजी आणि रानफळांचे जिल्ह्यात तुलनेने प्रमाण अधिक आहे. रानभाजी विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उभी झाल्यास अनेकांना रोजगार उपलब्ध होईल, असे मत व्यवस्थापक शरद कांबळे यांनी व्यक्त केले.
.....................
फोटो : १८
फोटो - रानभाजी महोत्सवात दर्जेदार भाज्यांचे प्रदर्शन भरविल्याबद्दल बचतगटातील महिलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करताना प्रा. शरद कांबळे.