आंबेडकर जयंतीच्या औचित्यावर जीवन प्रकाश योजना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:43+5:302021-04-15T04:39:43+5:30
वाशिम : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून, राज्याच्या ऊर्जा विभागाने १२ एप्रिल रोजी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ अंमलात ...
वाशिम : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून, राज्याच्या ऊर्जा विभागाने १२ एप्रिल रोजी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ अंमलात आणली आहे. पाच समान हप्त्यात ५०० रुपये अनामत रकमेचा भरणा करून एससी, एसटी प्रवर्गातील लाभार्थींना वीजजोडणी दिली जाणार आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टिकोनातून वीजजोडणी विशेष मोहीम १४ एप्रिल, २०२१ ते ६ डिसेंबर, २०२१ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सुलभरीत्या वीजजोडणी मिळावी, याकरिता राज्याच्या ऊर्जा विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. एससी, एसटी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थीला महावितरणकडे आवश्यक त्या प्रमाणपत्रासह ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. लाभार्थीला पाच हप्त्यात ५०० रुपये अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे. संबंधित लाभार्थी राहत असलेल्या ठिकाणी विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास अर्ज केल्यापासून १५ दिवसांत वीजजोडणी देण्यात येणार आहे. वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यास, अशा ठिकाणी महावितरणद्वारे स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी किंवा अन्य मार्गाने निधी उपलब्ध केला जावा, अशा सूचना ऊर्जा विभागाने दिल्या आहेत.