मजूरांच्या ‘जॉब कार्ड’बाबत लवकरच घेतला जाणार आढावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:24 PM2017-10-16T13:24:40+5:302017-10-16T13:24:48+5:30
वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजूरांना देण्यात येणारे जॉब कार्ड हे ग्राम पंचायतमध्ये ठेवण्यास सक्त मनाई आहे. तथापि, अद्यापही ग्राम पंचायतमध्येच जॉब कार्ड ठेवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पृष्ठभूमीवर जॉब कार्डसंदर्भात आढावा घेऊन ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड न ठेवण्याच्या सूचना सर्वांना दिल्या जाणार आहेत.
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. रोजगार मिळण्यासाठी मजूरांना नोंदणी करावी लागते. नोंदणीकृत मजूरांना जॉब कार्ड मिळाल्यानुसार, त्यानुसार काम उपलब्ध करून दिले जाते. किती दिवस काम केले, मजूरी किती यासह अन्य माहिती जॉब कार्डवर ठेवून या योजनेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न शासनातर्फ करण्यात आला. मजुरांना दिलेली जॉब कार्ड ही मजुरांकडे ठेवण्याबाबतची तरतुददेखील करण्यात आलेली आहे. असे असतानादेखील ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड ठेवण्याचे प्रकार समोर येत असल्याने आता शासनाने प्रशासनाला यासंदर्भात सक्त सूचना देत तपासणी करण्याचे फर्मान सोडले आहे.
मजुरांना देण्यात आलेली जॉब कार्ड ग्राम पंचायत कार्यालयास ठेवल्यास त्यामध्ये बºयाच अडचणी निर्माण होवू शकतात तसेच मजुरांना त्यांनी किती दिवस काम केले व किती मजुरी मिळाली याबाबतची माहिती मिळू शकत नाही. या पृष्ठभूमीवर आता कोणत्याही परिस्थितीत ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड राहू नये, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला मिळाल्या आहेत. या सूचनाच्या अनुषंगाने जिल्हयाचा आढावा घेउन या कार्यक्रमाअंतर्गत मजुरांना दिलेली जॉब कार्ड ही ग्राम पंचायत कार्यालयात ठेवली असल्यास ती संबंधित मजुरांकडे तात्काळ देण्यात यावी तसेच यापुढे ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही मजुराचे जॉबकार्ड राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या जाणार आहेत.