महानगरांमधून परतलेल्या मजूरांना दिले जाताहेत ‘जॉबकार्ड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:00 AM2020-05-31T11:00:50+5:302020-05-31T11:01:07+5:30
संबंधित मजूरांना जॉबकार्डचे वितरण करून कामे देणे सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीपोटी महानगरांमधून गावी परतलेल्या मजूरांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवरून नियोजन करणे सुरू आहे. दरम्यान, वाशिम पंचायत समितीने तालुक्यातील ४० गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे सुरू केली असून जॉबकार्ड वितरण प्रक्रियाही राबविण्यात येत असल्याची माहिती विस्तार अधिकारी विजय खिल्लारे यांनी दिली.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेला लॉकडाऊन आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असतानाही वाशिम पंचायत समितीने त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम होऊ दिलेला नाही. वाशिम तालुक्यातील सात गावांमध्ये उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्या-त्या गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. महानगरांमधून गावी परतलेल्यांचा क्वारंटीन कालावधी संपल्याने त्यांच्या हाताला आता काम मिळणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधित मजूरांना जॉबकार्डचे वितरण करून कामे देणे सुरू करण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात गावी परतलेल्या मजूरांच्या मागणीनुसार त्यांना ‘जॉब कार्ड’ देणे सुरू करण्यात आले. त्यानंतर त्यांच्याच मागणीनुसार त्यांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्येही विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
- विजय खिल्लारे
विस्तार अधिकारी पंचायत
पंचायत समिती, वाशिम