कोरोना असेपर्यंतच नोकरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:47+5:302021-03-05T04:41:47+5:30
जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतरच्या काहीच महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढायला लागली. यामुळे ...
जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतरच्या काहीच महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढायला लागली. यामुळे कंत्राटी तत्त्वावर परिचारिका, अधिपरिचारिका, डॉक्टर्स, लॅब टेक्नीशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी पदे भरण्यात आली. नोव्हेंबर २०२० पासून रुग्णसंख्येचा आलेख खाली उतरल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कामावरून कमी करण्यात आले; मात्र १४ फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळे कामावरून कमी केलेल्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले. मात्र, ही नोकरी कोरोना असेपर्यंतच असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
........................
७० अधिपरिचारिका कामावर रुजू
कोरोनाकाळात कामावर घेऊन कमी केलेल्या ७० अधिपरिचारिकांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले आहे. यासह एमबीबीएस डॉक्टर्स, लॅब टेक्नीशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर ही पदेही भरण्यात आली आहेत. आणखी जवळपास १०० लोकांची ‘वेटींग लिस्ट’ असून गरजेनुसार त्यांना नियुक्ती दिली जात आहे.
..............
९३६०
कोरोनाचे एकूण रुग्ण
७७४७
बरे झालेले रुग्ण
.......
१४५१
अॅक्टिव्ह रुग्ण
१६१
कोरोनाबळी
...................
०९
एकूण कोविड केअर सेंटर
सध्या सुरू असलेले कोविड केअर सेंटर - ०९
...........
कोट :
गतवर्षी कोरोनाकाळात ‘स्टाफ नर्स’ म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरी मिळाली होती. मात्र, मध्यंतरी कामावरून कमी करण्यात आले. आता पुन्हा रुजू करून घेण्यात आले आहे. कोरोनाबाधितांची सेवा करण्याची संधी मिळत असल्याने आनंदी आहे.
- प्रज्ञा गायकवाड, वारला पीएचसी
...........
आरोग्य विभागातील वरिष्ठांच्या आदेशावरून पुन्हा कंत्राटी तत्त्वावर कामावर रुजू झाले आहे. रुग्णसेवा देण्याची संधी मिळाल्याने कुठलाही कमीपणा वाटत नाही; मात्र किमान काही वर्षे तरी कामावर ठेवावे, अशी अपेक्षा आहे.
- प्रियंका थोरात, तोंडगाव पीएचसी
...........
कोरोनाकाळात अधिपरिचारिका म्हणून कंत्राटी तत्त्वावर आरोग्य विभागाने नोकरी दिली. काही महिने काम केल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या कमी होताच कामावरून कमी करण्यात आले. मात्र, त्याच अनुभवाच्या जोरावर पुन्हा संधी मिळाली.
- शारदा जाधव, डीसीएचसी, वाशिम