काजळेश्वरची कलिंगडे कोलकात्याच्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:18+5:302021-03-13T05:16:18+5:30
काजळेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी दिगांबर यांनी डिसेंबर २०२० अखेर त्यांच्या शेतजमिनीपैकी दीड एकर क्षेत्रात कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ ...
काजळेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी दिगांबर यांनी डिसेंबर २०२० अखेर त्यांच्या शेतजमिनीपैकी दीड एकर क्षेत्रात कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत टरबूज पिकाची लागवड केली. त्यांनी १२,५०० रोपांची लागवड केली होती. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या दोन मुलांनी योग्य व्यवस्थापन केल्याने अवघ्या ७० दिवसांत त्यांना दीड एकरातून ५० टन टरबुजाचे उत्पादन झाले. टरबुजाचा दर्जा आणि आकार चांगला असल्याने कोलकात्याच्या व्यापाऱ्यांकडून या टरबुजाला मागणी आली. त्यांच्याकडून चांगला दरही मिळाल्याने डिगांबर उपाध्ये यांनी कोलकात्याच्या व्यापाऱ्यांना ही टरबुजे विकली. यातून त्यांना तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले, तर एक लाख रुपये खर्च वजा जाता दोन लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.
--------
कोट: ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार दीड एकरात यंदा टरबुजाची शेती केली. त्यात यश आले. माझ्या दोन्ही मुलांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात परिश्रम घेत पिकाचे योग्य व्यवस्थापन केले. त्यामुळे ७० दिवसांत ५० टन टरबुजाचे उत्पादन झाले. पारंपरिक शेतीसोबत बागायती, फळशेतीचा आधार घेतल्यास शेतकरी समृद्ध होऊ शकतो.
- डिगांबर उपाध्ये,
शेतकरी, काजळेश्वर
------------
कोट : ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत काजळेश्वरचे प्रगतिशील शेतकरी डिगांबर उपाध्ये यांनी त्यांच्याकडील शेतजमिनीपैकी दीड एकरावर टरबुजाची लागवड केली. योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना ७० दिवसांत ५० टन टरबुजाचे उत्पादन झाले. ही टरबुजे कोलकात्याच्या बाजारात विकल्याने त्यांना निव्वळ दोन लाख रुपये नफाही झाला.
-संतोष वाळके,
तालुका कृषी अधिकारी, कारंजा