कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:30+5:302021-07-11T04:27:30+5:30
गेल्या ६० वर्षांपूर्वी कामरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यासाठी कामरगाव येथील लक्ष्मीबाई रामकिसन जाखोटिया यांनी ३ ...
गेल्या ६० वर्षांपूर्वी कामरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यासाठी कामरगाव येथील लक्ष्मीबाई रामकिसन जाखोटिया यांनी ३ एकर जमीन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दान दिली. त्यानंतर १४ नोव्हेंबर १९६० मध्ये आबासाहेब खेडकर यांच्या हस्ते ईमारतीची कोनशिला बसविण्यात आली. काही वर्षांनंतर कामरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मनभा येथे स्थलांतरीत करण्यात आले आणि कामरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. आता ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला ६० वर्षे उलटली तरी, या इमारतीची अद्यापही दुरुस्ती अथवा डागडुजी करण्यात आली नाही. सद्य:स्थितीत ही इमारत जीर्ण झाली असून, इमारतीचे समोरील छत क्षतिग्रस्त झाले आहे. या छताखालून दर दिवशी रुग्ण, वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णालयातील कर्मचारी ये-जा करतात. एखाद वेळी छताचा भाग कोसळल्यास अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी किंवा नवीन इमारत बांधकामासाठी लोकप्रतिनीधींनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
----------------------------------------
सात वर्षांपासून ऑपरेशन थिएटर बंद
कामरगाव रुग्णालयात प्रारंभी ऑपरेशन थिएटरची व्यवस्था होती. त्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, तसेच नेत्रशस्त्रक्रिया केल्या जात होत्या, परंतु गेल्या सात वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षामुळे येथील ऑपरेशन थिएटर बंद झाल्याने परिसरातील रुग्णांना आता खासगी दवाखान्यात शस्त्रक्रियेचा मोठा खर्च करावा लागत आहे.
----------------------------------------
स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय
कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असतानाच येथे विविध सोयी-सुविधांचाही अभाव आहे. त्यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. स्वच्छतागृहाच्या दरवाजांची पार माेडतोड झाली असून, या उघड्या स्वच्छतागृहांमुळे महिला रुग्णांची कुचंबना होत आहे.