आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीचे केले कन्यादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:07+5:302021-06-01T04:31:07+5:30
माणिक डेरे मानोरा : आई-वडिलाचे छत्र हरवलेल्या मुलीचे कन्यादान करून, कारखेडा ग्रामपंचायतने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वधू ...
माणिक डेरे
मानोरा : आई-वडिलाचे छत्र हरवलेल्या मुलीचे कन्यादान करून, कारखेडा ग्रामपंचायतने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वधू पित्याची भूमिका ठाणेदार शिशिर मानकर यांनी तर पंचायत विस्तार अधिकार संजय भगत यांनी मामाचे कर्तव्य पार पाडले.
आई-वडिलाचे छत्र हरवलेल्या अनाथ मुलीचा विवाह कारखेडा ग्रामपंचायतने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
कारखेडा येथील रहिवासी दीक्षा गजानन डाखोरे या मुलीच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने, कारखेडा ग्रामपंचायतने हे कुटुंब दत्तक घेतले होते. कुटुंबाचे पालनपोषणासह संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी घेतली होती. ३१ मे रोजी दीक्षाचा विवाह नांदेड जिल्हातील माहूर तालुक्यातील पडसा या गावातील निखिल गावंडे या युवकाशी जुळल्याने गावच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके यांनी ग्रामपंचायतचा रीतसर ठराव घेऊन, दीक्षाच्या लग्नाचा रीतसर खर्च उचलला. तिला आई-वडील नसल्यामुळे प्रशासनाचा या विवाह सोहळ्यात सहभाग घेण्यात आला. वधू पित्याची भूमिका मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी घेऊन, रीतसर व्याहीभेट स्वीकारून मुलीचे कन्यादान सहपत्नीक केले, तर मामाचे सोपस्कार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय भगत यांनी पार पाडले. विस्तार अधिकारी सतीश नायसे यांनीही कन्यादान कार्यक्रमात सहभाग नोंदविला. गावच्या सरपंच सोनाली सोळंके यांनी निराधार मुलीचे कन्यादान व सोयरपण प्रशासनाने स्वीकारल्याने हा विवाह सोहळा प्रेरणा देणारा ठरला, असे मत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच अनिल सीताराम काजळे, ग्रामसेवक अनिल सूर्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, जि.प. शिक्षक रणजीत जाधव, ग्रामपंचायत सदस्या चैताली विवेक परांडे, वर्षा मोहन देशमुख, प्रमिला राजू चव्हाण, गणेश जाधव, मनोज किशोर तायडे, बाळू जाधव यांची उपस्थिती होती.