कर्जमाफीमुळे शेतक-यांना दिलासा - तिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:43 AM2017-07-29T02:43:08+5:302017-07-29T02:43:08+5:30
कर्जमाफीनंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे तिवारी म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने ३० जून २०१६ अखेर थकीत असलेले शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील ४० लाख शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी राबविलेल्या विविध योजनांचा शेतक-यांना अतिशय फायदा झाल्याचे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्य शासनाने ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. याकरिता पात्र शेतकºयांचे आॅनलाइन व आॅफलाइन अर्जासह आधार क्रमांक संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांना सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज भरण्याची नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्या बँकेतून शेतकºयाने कर्ज घेतले आहे, त्या बँक शाखेत आॅफलाइन स्वरूपातील अर्ज स्वीकारले जात आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज प्रक्रिया ठेवल्यामुळे प्रामाणिक शेतकºयांचा या योजनेचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांबाबत त्यांनी माहिती दिली तसेच शेतकºयांचे आत्महत्यांचे प्रमाणही कमी होत आहे. कर्जमाफीनंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे तिवारी म्हणाले. यावेळी त्यांनी तूर खरेदी, खरीप हंगामासाठी १० हजार रुपयांची तातडीची मदत, पीक कर्ज वितरण याविषयी माहिती दिली.