बंदी हटल्यानंतरही कारंजा आगाराची बस बंदच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘खाे’
By नंदकिशोर नारे | Published: February 21, 2024 01:21 PM2024-02-21T13:21:28+5:302024-02-21T13:22:42+5:30
कारंजा आगार व्यवस्थापकाने आपली मनमानी करत ही बस अद्याप सुरु केली नाही.
नंदकिशाेर नारे
वाशिम - नागपुर ते छञपती संभाजीनगर या महामार्गावरील काटेपुर्णा नदीवरील धोकादायक बनलेल्या पूलावरुन अवजड वाहनाच्या वाहतुकीला चार महिण्यापुर्वी एका आदेशाव्दारे जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली होती. त्यामुळे या मार्गावरुन कारंजा आगाराची कारंजा ते मालेगांव ही एकमेव असलेली एसटी बस आगार व्यवस्थापकाने बंद केली होती. आता जिल्हाधिकारी यांनी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ही बंदी एका आदेशाद्वारे उठविली असली तरी कारंजा आगार व्यवस्थापकाने आपली मनमानी करत ही बस अद्याप सुरु केली नाही.
नागपुर ते छञपती संभाजीनगर या ७५३ सी माहामार्गावरील कारंजा ते मालेगांव या जवळपास ७५ किलोमीटर अतंराच्या मार्गावर लांब पल्याच्या एक ते दोन बस वगळता एसटी महामंडळाची कुठलिही दूसरी बस सेवा उपलब्ध नाही. पूल क्षतिग्रस्त झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली हाेती. तब्बल चार महिण्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी अधिकृत आदेशाव्दारे या पुलावरुन अवजड वाहण्याच्या वाहतुकीला घातलेली बंदी उठविली व हा पूल सर्वच वाहनाच्या वाहतुकीसाठी खुला केला. परंतु कारंजा ते मालेगांव ही बस अद्यापही सुरू करण्यात आली नाही. कारंजा मालेगांव ही बस सेवा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी या मार्गावरील प्रवाशासह सर्वच नागरिकामधुन होत आहे.