कारंजातील उपजिल्हारूग्णालय ईमारतीच्या लोकापर्णाच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 03:21 PM2018-06-27T15:21:54+5:302018-06-27T15:23:33+5:30
उपजिल्हारूग्णालयाची ईमारत उभी झाली; परंतु या रूग्णालयाच्या ईमारतीचे लोकापर्ण २ वर्षांपासून रखडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: वाशिम जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या, तसेच जैनांची काशी व गुरूमहाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या कारंजा शहरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून, माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या प्रयत्नाने भव्य अशी उपजिल्हारूग्णालयाची ईमारत उभी झाली; परंतु या रूग्णालयाच्या ईमारतीचे लोकापर्ण २ वर्षांपासून रखडले आहे. हे रूग्णालय रूग्णाच्या सेवेत लवकर सुरू व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनतेच्यावतीने होत आहे.
कारंजा ग्रामीण रूग्णालयाचे रूपांतर सहा वषापूर्वी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येवून नवीन ईमारत बांधकामासाठी ८ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे नागरिकांच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या ; परंतु बांधकाम होवून २ वर्षे झाली, मात्र इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त अद्यापही शासनाच्या पंचागात सापडत नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही ईमारत जणू शोभेची वास्तूच ठरत आहे. ते सुरू होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोणतीच हालचाल दिसून येत नाही. आता स्थानिक लोकप्रतिनिधींची पुढाकर घ्यावा आणि ईमारतीच्या लोकापर्णाचा सोपस्कार पार पाडून ते जनसेवेत रुजू करावे, अशी मागणी होत आहे.