कारंजा : निष्ठावंताच्या मनसुब्यावर पाणी फिरणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:24 PM2019-10-05T14:24:03+5:302019-10-05T14:24:08+5:30
प्रमुख पक्षाचे उमेदवार अडचणीत येणार असून, ही फळी जोडायची कशी, हा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकणार आहे.
- दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधानसभा निवडणुकीत आपला हेतू साध्य करण्यासाठी पक्षांतर करणाऱ्या संधीसाधूंना तिकिट देऊन निष्ठावंतांच्या मनसुब्यावर घाव घालण्याचा प्रकार कारंजा मतदारसंघात घडला आहे. हा प्रकार आता प्रमुख पक्षांच्या ऊमेदवारांनाच आता भारी पडणार आहे.
कारंजा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादी काँगे्रसकडून माजी आमदार प्रकाश डहाके, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. राम चव्हाण, तर बसपाकडून मो. युसूफ पुंजानी हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात जवळपास प्रत्येकच उमेदवार पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी धडपडत होता. त्यात काही निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही समावेश होता. भाजप वगळता इतर सर्वच पक्षात ही बाब पाहायला मिळाली. त्यातही काही महिन्यांपूर्वी माजी आमदार प्रकाश डहाके यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याच्या आणि शिवसेनेचे तिकिट त्यांना मिळण्याच्या आशेने काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. तथापि, कारंजा मतदारसंघ भाजपाला सुटला आणि प्रकाश डहाके यांनी अपक्ष निवडणूक लढविण्यापेक्षा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये पुनर्प्रवेश करीत उमेदवारीही मिळविली, तर भारीपची महत्त्वाची पदे सोडूनही तिकिटापासून ‘वंचित’ राहिलेले मो. युसूफ पुंजानी यांनी बसपाचे तिकिट मिळविले. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीने डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी माजी जि.प. सदस्य रणजीत जाधवही इच्छूक होते. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. श्याम जाधव यांनी तिकिटासाठी खूप प्रयत्न केले होते, तर बसपाकडूनही निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छूक होते. पक्षाच्या हितासाठी झटणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी प्रवेश घेतलेल्यांना तिकिट बहाल करून पक्षश्रेष्ठींनी इच्छुकांच्या मनसुब्यावरच घाव घातला आहे. आता हे पदाधिकारी, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी पूर्ण ताकदीनिशी कार्य करण्याची शक्यता मुळीच राहिली नाही. यामुळे प्रमुख पक्षाचे उमेदवार अडचणीत येणार असून, ही फळी जोडायची कशी, हा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकणार आहे.
आठ अपक्ष रिंगणात
कारंजा विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून प्रमुख उमेदवारांसह एकूण ११ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत. तथापि, त्यापैकी ८ उमेदवारांनीच निव्वळ अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश डहाके यांनी अर्ज दाखल केला असताना याच पक्षाकडून पूर्वी माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीही अर्ज दाखल केला, तसेच अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.