कारखेडा गाव झाले चुलमुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 04:13 PM2020-10-18T16:13:57+5:302020-10-18T16:14:03+5:30
गॅस सिलिंडरचा नियमित वापर होत असल्याने कारखेडा गाव चुलमुक्त झाले आहे.
- बबन देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता करण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत पात्र महिलांना मोफत सिलिंडर गॅस शेगडी पुरविण्यात आली. कारखेडा येथील जवळपास ४५० महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याने आणि स्वखर्चातून सिलिंडर रिफिलिंग नियमित सुरू असल्याने कारखेडा गाव चुलमुक्त, धुरमुक्त झाले आहे. महिला, गावकऱ्यांच्या एकजूटीतून कारखेडा गावाने इतरांसमोर आदर्श निर्माण केला.
चुलीच्या धुरापासून महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. धूर हा डोळ्यात जात असल्याने डोळ्याशी संबंधित आजारही जडतात. श्वास घेण्यास त्रासही जाणवते. चुलीच्या धुरापासून गोरगरीब महिलांची मुक्तता करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१८-१९ मध्ये पंतप्रधान उज्वला योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस सिलिंडर, शेगडी पुरविण्यात येते. ६०० कुटुंबसंख्या आणि अडीच हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या कारखेडा येथेही उज्वला योजना राबविण्यात आली. या योजनेपूर्वी गावातील जवळपास १५० कुटुंबाकडे गॅस सिलिंडर होते. या योजनेंतर्गत सन २०१८-१९ मध्ये ४५० च्या आसपास महिलांना गॅस सिलिंडरचा लाभ मिळाला. सिलिंडर रिफिलिंगकरीता शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. तथापि, चुलीच्या धुरापासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेता या योजनेंतर्गतच्या महिला लाभार्थी या स्वखर्चातून रिफिलिंग करतात. कारखेडा येथे दर आठवड्यातून एक दिवस पोहरादेवी येथून गॅस सिलिंडर रिफिलिंगसाठी एक वाहन येते. त्यामुळे महिला लाभार्थींना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही. गॅस सिलिंडरचा नियमित वापर होत असल्याने कारखेडा गाव चुलमुक्त झाले आहे. चुलमुक्तीसाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. तत्कालिन जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण, संजय महाराज, मनिष महाराज यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. गावात चुलमुक्त कार्यक्रम घेऊन महिलांचा सत्कारही केला होता.