वाशिमचे कावडधारी युवक, वडदच्या गावकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांची सतर्कता

By सुनील काकडे | Published: September 9, 2023 08:23 PM2023-09-09T20:23:25+5:302023-09-09T20:23:41+5:30

कावडधाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले

Kavadhari youth of Washim, clash between villagers of Vadad | वाशिमचे कावडधारी युवक, वडदच्या गावकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांची सतर्कता

वाशिमचे कावडधारी युवक, वडदच्या गावकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांची सतर्कता

googlenewsNext

वाशिम : औंढा नागनाथ (जि.हिंगोली) येथे जल आणण्यासाठी गेलेले वाशिम शहरातील कावडधारी युवक परतीच्या मार्गावर असताना कनेरगावपासून ८ किलोमिटर अंतरावरील वडद फाट्यानजिक असलेल्या ढाबा मालकासोबत त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी वडद गावातील सुमारे १५० ग्रामस्थ व कावडधाऱ्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. पोलिसांनी सतर्कता दाखवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना शनिवार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, वाशिम शहरातील २० ते २२ कावडी औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ येथून जल आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेल्या होत्या. ९ सप्टेंबर रोजी त्या परतीच्या मार्गावर असताना दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वडद फाटा येथे आल्यानंतर कावडीतील काही युवक व ढाबा मालक सचिन पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वादाला तोंड फुटले. शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेला. ही वार्ता पसरताच काहीच क्षणात गावातून ट्रॅक्टरमध्ये सुमारे १५० जण ढाब्यासमोर येऊन थांबले. तसेच ट्रॅक्टर आडवा करून येणाऱ्या कावडींना अडविणे सुरू करण्यात आल्याने गावकरी व कावडधारी युवकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.

घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक अशोक कांबळे, जमादार आकास पंडीतकर, शंकर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर घटनास्थळाहून कावडींना पुढे मार्गस्थ करण्यात आले. तसेच वडद येथील गावकऱ्यांची समजूत काढून त्यांनाही गावाकडे परत पाठविण्यात आले. या घटनेतील जखमी सचिन पाटील यांना उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वडद फाटा (जि.हिंगोली) येथे घडलेल्या घटनेची माहिती प्राप्त झाली असून आम्ही परिस्थितीवर पूर्णत: नियंत्रण ठेवून आहोत. वाशिम शहरातील कावडधारी युवकांना वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजगाव येथे हलविण्यात आले आहे.
- प्रमोद इंगळे, ठाणेदार, वाशिम ग्रामीण पो.स्टे.

Web Title: Kavadhari youth of Washim, clash between villagers of Vadad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.