खरीप हंगामातील पिकांची वाढ समाधानकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:05 PM2018-07-07T17:05:34+5:302018-07-07T17:06:52+5:30
वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे. खरीपासाठी पोषक वातावरण असल्याने किमान यंदातरी भरघोस उत्पादन हाती येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.
गतवर्षी पर्जन्यमान घटल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून विशेष उत्पन्न घेता आले नाही. सोबतच २०१७ च्या रब्बी हंगामात उद्भवलेल्या विविध स्वरूपातील अडथळ्यांमुळे शेतकरी पुरते हतबल झाले. यंदा मात्र सुरूवातीपासूनच पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले असून पाऊसही अधूनमधून अपेक्षित प्रमाणात हजेरी लावत असल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत आहे. त्यामुळे भरघोस पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे.
कृषी सेवा केंद्रांवर वाढली गर्दी!
पिकांना गरजेपुरता तथा वेळेवर पाऊस होत असल्याने खरीपातील पिकांची वाढ अपेक्षित प्रमाणात होत आहे. यासोबतच पिकांमध्ये तन देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याचा नाश करण्यासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक औषध फवारणीचे काम सुरू झाले आहे. सदर औषधी खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.