नाफेडच्या दिरंगाईने कोलमडणार खरिपाचे नियोजन !
By admin | Published: May 16, 2017 01:42 AM2017-05-16T01:42:47+5:302017-05-16T01:42:47+5:30
तूर विकल्यानंतरही पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे यावर्षी खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : मंगरुळपीर तालुक्यात यावर्षी नाफेड केंद्रावर तुर विक्रीकरिता शेतकऱ्यांना अनेक संकटाशी सामना करावा लागला. एवढेच नव्हे तर ऐन खरीप हंगाम तोंडावर असतांना बहूतांश शेतकऱ्यांकडे तुर पडून असल्यामुळे तर काहींना तूर विकल्यानंतरही पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे यावर्षी खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.
मंगरुळपीर तालुक्यात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. निसर्गाच्या साथीमुळे यावर्षी बहूतांश शेतकऱ्यांना तुर अधिक प्रमाणात झाली. अस्मानी संकट टळले आता सुलतानी संकट येणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र नाफेड केंद्र सुरु होण्यापुर्वी शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना तुर विकावी लागली. त्यानंतर कसेबसे नाफेड केंद्र सुरु झाले. मात्र सुरुवातीपासून कधी जागेअभावी तर कधी बारदाण्याअभावी नाफेड केंद्रावर तुर मोजण्यासाठी अडचणी येत गेल्या. या दरम्यान शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तुर विकली. त्यात तोटा झाला आणि तुर मोजणीचे काम संथगतीने होत गेले. त्यामुळे खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आला असतांना अनेक शेतकऱ्यांची तुर नाफेड केंद्रावर मोजणीच्या प्रतिक्षेत पडुन आहे. अशा सुलतानी संकटामुळे यावर्षी खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार, असे शेतकरी बोलत आहे. तूरीचे पैसे वेळेवर मिळाले नाही तर खरिप हंगामात शेतीपयोगी व पेरणीयोग्य साहित्य खरेदी कसे करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. नाफेडद्वारे आता तूरीची मोजणी सुरू आहे. टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. तूर विक्रीनंतर वेळेवर पैसे मिळणेही गरजेचे आहे. मंगरूळपीर बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी योग्य ती व्यवस्था केली आहे.