खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:30+5:302021-05-04T04:18:30+5:30
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री ॲड. किरणराव सरनाईक, लखन मलिक, अमित ...
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री ॲड. किरणराव सरनाईक, लखन मलिक, अमित झनक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा उपनिबंधक मैत्रवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेण्यात येते. यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे सरसकट सोयाबीन शेतकऱ्यांनी न विकता, येत्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकरी स्वतःचे बियाणे कसे वापरतील, यासाठी कृषी विभागाने त्यांना प्रवृत्त करावे. राष्ट्रीयीकृत व सहकारी मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जपुरवठा करावा. जास्त दराने जिल्ह्यात खते व बियाण्यांची विक्री होणार नाही, याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे. प्रसंगी कृषी केंद्रावर गुन्हे दाखल करावेत, असे त्यांनी सांगितले.
खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यात सोयाबीनला पर्यायी पिके यावर्षी लावण्यात आली पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. आ. झनक म्हणाले की, यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे. उन्हाळी सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांशी कृषी विभागाने संपर्क साधून आगामी खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरणीसाठी ते बियाणे कसे उपयोगात आणता येईल, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी खरीप हंगाम आढावाबाबत माहिती देताना सांगितले की, चालू वर्षी ४ लाख ६ हजार ४५० हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. तालुक्याच्या बैठका लोकप्रतिनिधी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आहेत. या बैठकीला संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कृषी विभागाने बीजप्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी, पेरणी, रासायनिक खतांचा वापर याविषयी माहिती देणारी भिंतीपत्रिका तयार केली असून, या भिंतीपत्रिकेचे विमोचन पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.