खरीप हंगाम नियोजन ; ६० हजार मे. टन खतसाठा मंजूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:49+5:302021-03-08T04:38:49+5:30
जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात साधारणत: चार लाख हेक्टरवर पेरणी होते. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो. २०२१ मधील खरीप ...
जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात साधारणत: चार लाख हेक्टरवर पेरणी होते. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो. २०२१ मधील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागातर्फे आतापासूनच केले जात असून, खताची टंचाई निर्माण होऊ नये यावर भर देण्यात आला. गतवर्षी खरीप हंगामात काही ठिकाणी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या प्रकारातील खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने जवळपास ८० हजार मे.टन खताची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली. ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला असून, गतवर्षीचा पाच हजार मे. टन खतसाठा शिल्लक आहे. येत्या खरीप हंगामात जवळपास ६५ हजार मे. टन खतसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, अशी आशा कृषी विभाग बाळगून आहे. कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खतसाठा, किमतीसंदर्भात फलक लावण्याच्या सूचनाही कृषी विभागाने दिल्या आहेत. खतासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांना तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय कृषी विभागाशी संपर्क साधता येणार आहे.
बॉेक्स
ऑनलाईन खतविक्री अनिवार्य
खतासंदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, एमआरपीनुसारच विक्री व्हावी याकरिता पॉस मशिनच्या माध्यमातूनच विक्रेत्यांनी खताची विक्री करावी, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. विक्रेत्यांना पॉस मशीन उपलब्ध केल्या असून, ऑफलाईन पद्धतीने खतविक्री केल्यास संबंधितांविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिला आहे.
.............
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे होणार निराकरण
खतासंदर्भात शेतकऱ्यांना तक्रार, अडचण असल्यास त्याचे निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच, त्यानुसार चौकशी करीत तक्रारीचे निराकरण केले जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
.............
कोट बॉक्स
येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झालेला आहे. २०२०-२१ या वर्षातील पाच हजार मे. टन खतसाठा शिल्लक असल्याने एकूण ६५ हजार मे. टन खतसाठा उपलब्ध होणार असल्याने खताची टंचाई निर्माण होणार नाही. खतासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- विकास बंडगर
कृषीविकास अधिकारी,
जिल्हा परिषद वाशिम
००
उपलब्ध होणाऱ्या खताचा प्रकार (मे.टन)
युरिया १०९८०
डीएपी १७९६०
एमओपी १७००
एनपीके १९७००
एसएसपी ९८७०