खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी आली ४७ पैसे; जिल्ह्यातील ७९३ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी
By दिनेश पठाडे | Published: October 31, 2022 01:45 PM2022-10-31T13:45:58+5:302022-10-31T13:46:26+5:30
सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना देखील नजर अंदाज ५४ पैसेवारी जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता.
वाशिम : सन २०२२-२३ मधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी शण्मुगराजन.एस यांनी सोमवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. जिल्ह्याची एकूण पैसेवारी ४७ पैसे इतकी निघाली आहे.
सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना देखील नजर अंदाज ५४ पैसेवारी जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. त्यामुळे सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर सुधारित पैसेवारी ५० पेक्षा कमी निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते. यावरून पीक परिस्थितीचा अंदाज येतो. यासोबत रॅण्डमली पीक कापणी प्रयोग होतात. त्यावरून उत्पन्नाचा अंदाज येतो.
सुधारित पैसेवारीच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३ लाख १५ हजार २८० हेक्टर क्षेत्र पिकाखालील आहे. यातील प्रमुख पिकांची ३१ आॅक्टोबर रोजी सर्व तालुक्याचे तहसीलदार यांचे कडून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ७९३ महसुली गावाची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जाहीर केली आहे. यासर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी निघाली आहे. जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे पीक उत्पादनात कमालीची घट झाल्याचे पहावयास मिळत आहे.
अशी आहे तालुकानिहाय पैसेवारी
तालुका--पैसेवारी
वाशिम--४७
मालेगाव--४८
रिसोड--४६
मंगरुळपीर--४७
कारंजा--४७
मानोरा--४७