चार लाख हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:56+5:302021-06-11T04:27:56+5:30

संतोष वानखडे वाशिम : गत चार दिवसांत काही ठिकाणी पाऊस झाला असून, शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभही केला आहे. यंदा चार ...

Kharif sowing to be done on four lakh hectares! | चार लाख हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी !

चार लाख हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी !

Next

संतोष वानखडे

वाशिम : गत चार दिवसांत काही ठिकाणी पाऊस झाला असून, शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभही केला आहे. यंदा चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, डीएपी खत आणि महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची तारांबळही उडत आहे.

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून येते. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन असून, सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. गत चार, पाच दिवसांत जिल्ह्यातील काही भागांत पाऊस पडला असून, शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीलादेखील प्रारंभ केल्याचे दिसून येते. बुधवारी गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. गुरुवारी गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.३ मि.मी. पाऊस झाला. यंदा मान्सून बऱ्यापैकी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गत चार, पाच दिवसांत दमदार पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीलादेखील प्रारंभ केला आहे. दरम्यान, दमदार पाऊस नसतानाही पेरणी केल्यास ही पेरणी अंगलट येऊ शकते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. कमी-अधिक प्रमाणात पाऊस जरी पडला असला, तरी शेतकऱ्यांनी सध्याच पेरणीची घाई करू नये, दमदार पाऊस असेल तरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

......

बॉक्स

महाबीज बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

महाबीजच्या ३० किलो सोयाबीन बियाणे बॅगची किंमत २२५० रुपये आणि इतर कंपनीच्या ३० किलो सोयाबीन बियाणे बॅगची किंमत ३३५० रुपयांच्या आसपास असल्याने महाबीजच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महाबीजचे ११८७० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाले असून जवळपास ९० टक्के बियाण्याची विक्रीदेखील झाली. १० टक्के बियाणे शिल्लक असून, यासाठी शेतकऱ्यांची स्पर्धा लागल्याचे दिसून येते. वणवण भटकंती करूनही महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

.......

बॉक्स

डीएपी खतांचा कृत्रिम तुटवडा

खताची टंचाई भासू नये म्हणून ६१ हजार ८०० मेट्रिक टन खताची मागणी केली असून आतापर्यंत ४१ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. सुरुवातीला डीएपी खताची किंमत जास्त असल्याने विक्रेत्यांनी पुरेशा प्रमाणात मागणी नोंदविली नाही. त्यानंतर केंद्र सरकारने सबसिडी वाढविल्याने डीएपी खताच्या किंमती कमी झाल्या. परिणामी, डीएपी खतांची मागणी अचानक वाढल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. डीएपी खतासाठी सध्या शेतकऱ्यांची पायपीट सुरू असल्याचे दिसून येते.

...................

महाबीजचे सोयाबीन बियाणे (क्विंटलमध्ये)

प्राप्त बियाणे ११८७०

विक्री १०६८३

शिल्लक ११८७

......

एक नजर खत साठ्यावर (मे.टनमध्ये)

एकूण मागणी ६१८००

प्राप्त ४०,०००

विक्री ३०,०००

शिल्लक १०,०००

००००००

..............

असे आहे पीकनिहाय पेरणीचे नियोजन

पीक हेक्टर

सोयाबीन ३,००,०००

तूर ६०,०००

कापूस २७,०००

उडिद १०,०००

मूग ७,०००

इतर २४५०

Web Title: Kharif sowing to be done on four lakh hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.