रिसाेड तालुक्यात होणार ७४१२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:49+5:302021-06-23T04:26:49+5:30
विवेकानंद ठाकरे रिसाेड : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्रथम पसंती दर्शवली असून, एकूण ७४ हजार १२३ हेक्टरपैकी ५७७५१ ...
विवेकानंद ठाकरे
रिसाेड : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्रथम पसंती दर्शवली असून, एकूण ७४ हजार १२३ हेक्टरपैकी ५७७५१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे तर तालुक्यातील शेतकरी कांदा पिकाबाबत निरुत्साह असून, केवळ ४० हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड होणार आहे.
रिसोड तालुक्यामध्ये लागवडीसाठी असलेले क्षेत्र ७४३१४५ हेक्टर असून, प्रत्यक्षात ७४ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. या पेरणीमध्ये शेतकऱ्यांनी दरवर्षीची परंपरा कायम ठेवत यंदाही सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी प्रथम स्थान दिलेले आहे तर त्याच्या पाठोपाठ तूर या पिकाला वाव दिला आहे. तूर पिकासाठी ९९३२ हेक्टर क्षेत्र आरक्षित आहे. तालुक्यात सोयाबीन हे पीक महत्त्वपूर्ण मानले जाते आणि पुरेसा पाऊस व पाण्याची सुविधा असल्यास उत्पादनसुद्धा भरपूर होत असते. यावर्षी शेवटी शेवटी सोयाबीनला उच्चांक असा भाव मिळाला आहे, यामुळे सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. हा भाव कायम राहावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. तालुक्यात पैनगंगा नदी असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो, तसेच जास्त पाऊस आला तर पैनगंगा नदीकाठच्या असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचे जास्त नुकसानसुद्धा हाेत असल्याचे दिसून येते.
..........
शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेऊन सोयाबीन या पिकाबाबत लक्ष घालून उत्पादन क्षमता वाढण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घ्यावा व कमी जागेत जास्त उत्पादन यावर लक्ष केंद्रित करावे. खर्च कमी उत्पन्न जास्त, हा मंत्र स्वीकारावा. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे .
काव्यश्री घोलप
तालुका कृषी अधिकारी, रिसोड.