मालेगाव तालुक्यात होणार ७९२०७ हेक्टरवर खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:41+5:302021-06-24T04:27:41+5:30
अमाेल कल्याणकर मालेगाव : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ७९ हजार २०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. काही पेरणी झाली ...
अमाेल कल्याणकर
मालेगाव : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ७९ हजार २०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. काही पेरणी झाली असून, काही ठिकाणी बाकी आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक पेरा सोयाबीनचा वाढणार असून, शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती मिळत आहे. मका, बाजरी आणि ऊस पेरणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात खरीप पिकाच्या लागवडीयोग्य सर्वसाधारण क्षेत्र ७० हजार ५५२ हेक्टर आहे. तालुक्यातील जमीन समतल असून, बहुतांश क्षेत्र सिंचनाखाली आहे. तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तीळ व कापूस ही पिके घेतली जातात. त्याचबरोबर करडई, सूर्यफूल व इतर गळीत धान्यांचाही पेरा केला जातो. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खरीप हंगाम नियोजनानुसार यावर्षी पीकनिहाय क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात ज्वारी २५५ हेक्टर, इतर पिके अर्थात भाजीपाला ५६० हेक्टर, तूर ८७५० हेक्टर, मूग ९०० हेक्टर, उडीद १२०० हेक्टर, सोयाबीन ५३९८४ हेक्टर आणि कपाशी ११६५ हेक्टर, ऊस १५ हेक्टर क्षेत्र याप्रमाणे पीकपेऱ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक पेऱ्यात वाढ झालेली नाही. यावर्षी सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल वाढला आहे. त्यातच यावर्षी कृषी विभागाकडून घरच्याच बियाणांची उगवण क्षमता तपासून तेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून, बहुतांश शेतकऱ्यांनी त्यास प्रतिसाद दिला आहे. यामुळे तालुक्यात बियाणे तुटवडा जाणवला नाही. तालुक्यात आतापर्यंत झालेला पाऊस हा सार्वत्रिक स्वरूपाचा नसून, काही भागात तुलनेने कमी पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे अशा काही ठिकाणच्या पेरण्या होणे अद्याप बाकी आहे. आतापर्यंत १९३.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
.............
यावर्षी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुसंख्य शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले आहे. त्यामुळे बियाणांचा तुटवडा पडला नाही.
- शशिकिरण जांभरूनकर, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव