राखीव वनक्षेत्रातील जमिनीवर खरीपाची पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:58 PM2019-07-02T16:58:37+5:302019-07-02T16:58:46+5:30

वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे.

Kharpi sowing in reserved forest area! | राखीव वनक्षेत्रातील जमिनीवर खरीपाची पेरणी!

राखीव वनक्षेत्रातील जमिनीवर खरीपाची पेरणी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासनाच्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. हे अतीक्रमण हटविण्याकामी झालेले प्रशासकीय प्रयत्न पूर्णत: निष्फळ ठरले असून शासनाच्या मूळ उद्देशाला तडे गेल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात वाशिमवनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर वनक्षेत्राचा विस्तार झालेला आहे. दरम्यान, शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी, या उद्देशाने राखीव वनक्षेत्र घोषित करण्याच्या अधिसूचनेनुसार महसूल विभागाकडून ४७९४.१४ हेक्टर ई-क्लास जमीन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्या जमिनीवर संबंधित त्या-त्या गावातील तसेच आसपासच्या काही लोकांनी अतीक्रमण करून जमीन वहितीखाली आणली आहे. चालू खरीप हंगामात या अतिक्रमीत जमिनीवर खरीपातील पिकांची पेरणी झाल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटविण्याकरिता महसूल विभाग व वनविभागाकडून काहीअंशी प्रयत्न देखील झाले; मात्र ते पूर्णत: निष्फळ ठरले आहेत.
 
राखीव वनक्षेत्रावर वनविभागाचाच हक्क!
वन संरक्षण कायद्यातील कलम २० नुसार राखीव वन क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रावर केवळ वनविभागाचाच हक्क राहत असून त्या जमिनीवर अन्य कुणाचेही कुठलेच अधिकार राहत नाहीत. असे असताना जिल्ह्यात काही लोकांनी वन संरक्षण कायद्याची पायमल्ली करित तब्बल ४७९४.१४ हेक्टर राखीव वन क्षेत्रात अतीक्रमण केले आहे.

पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी वनक्षेत्रात वाढ होणे आवश्यक आहे; मात्र वैयक्तीक फायद्यासाठी काही लोकांनी राखीव वन क्षेत्रात अतिक्रमण करून शेती वहितीखाली आणली आहे. अशा संबंधित अतिक्रमणधारकांना व त्यांना सहकार्य करणाऱ्यांविरूद्ध लवकरच कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
- सुमंत सोळंके
उपवनसंरक्षक, वाशिम वनविभाग

Web Title: Kharpi sowing in reserved forest area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.