खेर्डा खु.ने वर्षभरापासून कोरोनाला वेशीवरच रोखले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:40+5:302021-07-05T04:25:40+5:30
शेलूबाजार : कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आणि लाखो लोकांचा बळी घेतला. तथापि, अशी अनेक गावे आहेत ज्यांनी अद्याप ...
शेलूबाजार : कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आणि लाखो लोकांचा बळी घेतला. तथापि, अशी अनेक गावे आहेत ज्यांनी अद्याप कोरोनाला गावात प्रवेशच करू दिला नाही. त्यात मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील खेर्डा खु. या गावाचा समावेश आहे. गावकऱ्यांनी नियमांचे पालन करीत आरोग्याची योग्य काळजी घेतल्यानेच या गावात अद्यापही कोरोना संसर्गाला थारा मिळू शकला नाही.
मंगरुळपीर तालुक्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेने शेलूबाजार परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली होती. त्यात एक, दोघांचा बळी गेला, तर दुसऱ्या लाटेत परिसरात कोरोना संसर्गाने थैमानच घातले. परिसरातील ३० ते ३५ गावांपैकी अनेक गावांत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला; परंतु शेलूबाजार आरोग्य वर्धिनी केंद्राच्या हिरंगी आरोग्य उपकेंद्रातील खेर्डा. खु. या गावात कोरोना प्रवेशच करू शकला नाही. कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही गावातील एकाही व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला नाही.
--------------
त्रिसूत्री आणि काटेकोर नियमांचे पालन
कोरोना संसर्गामुळे वाशिम जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला असतानाही जिल्ह्यात या विषाणूच्या घातकतेबाबत फारसे गंभीर नाहीत. त्यामुळेच दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले होते. आरोग्य विभाग आणि प्रशासनाने तोंडाला मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा नियमित वापर, या त्रिसूत्रीचा अवलंब व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनही करण्याबाबत लोक उदासीन होते. तथापि, खेर्डा खु. गावात ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात गावकऱ्यांनी त्रिसूत्रीचा अवलंब करतानाच नियमांचे काटेकोर पालन केल्यानेच या गावात कोरोना संसर्गाचा प्रवेश होऊ शकला नाही, असे येथील आरोग्य सेवक नप्ते यांनी सांगितले.