स्वस्तिक नगरात घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 AM2021-09-02T05:30:06+5:302021-09-02T05:30:06+5:30
स्वस्तिक नगरात आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून रहिवासी असून मध्यंतरी हा भाग ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट होता. मात्र, आता दोन वर्षांपासून ...
स्वस्तिक नगरात आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून रहिवासी असून मध्यंतरी हा भाग ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट होता. मात्र, आता दोन वर्षांपासून हद्दवाढ झाल्याने तो भाग नगरपालिकेचा अधिनस्त असल्याने या स्वस्तिक नगराकडे नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम करतेवेळी सांडपाणी वाहणाऱ्या नालीसमोर १५ ते २० फूट खड्डा करून त्यामध्ये सांडपाणी अडवण्यात आले. या मागणीचे निवेदन २७ जुलै रोजी नगरपालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, त्यावर नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व रानडुकरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात तहसीलदार कारंजा यांनासुद्धा ही माहिती अवगत केली, त्यांनीसुद्धा यासंदर्भात कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे परिसरात नागरिकांना घाणीच्या साम्राज्यात वास्तव्य करावे लागत आहे. सध्या कारंजात डेंग्यूचा आजार सुरू असल्याने या परिसरातसुद्धा नागरिकांना आजार होण्याची भीती या सांडपाण्यामुळे होईल असे नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा दिलेल्या निवेदनातून शाम चव्हाण यांनी केला आहे.