चाकू हल्ला प्रकरणातील दोघांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:27 PM2020-01-14T15:27:28+5:302020-01-14T15:27:41+5:30
टिल्ल्या उर्फ विशाल प्रेमानंद शेलार (वय २०), शिवा भरत कांबळे (वय २३) दोघेही (रा. पंचशीलनगर वाशीम) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील पुसद नाका रेल्वे गेटजवळ दोघांनी केलेल्या चाकू हल्ल्यात दाविद पवसलवार पैठणे यांना गंभीर दुखापत झाली होती. ही घटना शहरात१३ जुलै २०१६ ला भरदिवसा घडली होती. या घटनेतील दोन हल्लेखोरांना एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अधिक १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. टिल्ल्या उर्फ विशाल प्रेमानंद शेलार (वय २०), शिवा भरत कांबळे (वय २३) दोघेही (रा. पंचशीलनगर वाशीम) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
अधिक माहितीनुसार, दाविद पैठणे यांनी तक्रार दिली की, घटनेच्या दिवशी फियार्दी हा भारत कांबळे याच्यासोबत पुसद रेल्वेगेट जवळच्या पुलावर बसला होता. यावेळी टिल्ल््या शेलार व शिवा कांबळे या दोघांनी येऊन फियार्दीकडे ५० रुपयांची मागणी केली. सदर रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे टिल्ल्या याने खिशातून धारदार चाकू काढून शिवा कांबळे जवळ दिला. यावेळी काही कळण्याआधी शिवा याने सदर चाकू फिर्यादीच्या पोटात मारल्याने गंभीर दुखापत झाली. अशा आशयाची तक्रार व वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले होते. तपास अधिकारी हवालदार माधव जमधाडे यांनी तपासाअंती सदर प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयाने या प्रकरणातील साक्षी तपासल्या. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर घटनेत दोन्ही आरोपी दोषी आढळून आल्याने न्यायमूतीर्नी त्यांना एक वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फेत सरकारी अभियोक्ता एस. के. साबळे यांनी काम पाहिले.
(प्रतिनिधी)