कोरोना काळातही कोकणचा हापूस थेट ग्राहकांच्या दारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:41 AM2021-05-14T04:41:04+5:302021-05-14T04:41:04+5:30
वाशिम : कोरोनाच्या संकट काळातही कर्तव्यपरायणतेचा प्रत्यय देत राज्यभरातील सहायक कृषी अधिकाऱ्यांनी आंबा उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतला. ...
वाशिम : कोरोनाच्या संकट काळातही कर्तव्यपरायणतेचा प्रत्यय देत राज्यभरातील सहायक कृषी अधिकाऱ्यांनी आंबा उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतला. या मंडळींनी कोकणातील सुमारे ६०० आंबा उत्पादकांची नाळ थेट ग्राहकांशी जुळवून दिली. या माध्यमातून अनंत अडचणी असतानाही आतापर्यंत तब्बल सहा कोटींचा हापूस आंबा विक्री झाल्याची माहिती राज्यस्तरीय समन्वयक यशवंत गव्हाणे (सावंतवाडी, सिंधुदुर्ग) यांनी दिली.
गतवर्षी आंब्याच्या सीझनमध्येच (एप्रिल/मे) राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने पसरण्यास सुरुवात झाली होती. अशाही स्थितीत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या राज्यभरातील चमूने तोंडाला मास्क लावून तथा फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळून स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत कोकणातील हापूस आंब्याची विक्री राज्यभरात व्हावी आणि या माध्यमातून आंबा उत्पादकांना हक्काचे मार्केट उपलब्ध व्हावे, या दृष्टीने नियोजन करून कोट्यवधी रुपयांची आंबा विक्री करून थेट ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची पद्धत अंगीकारली होती.
दरम्यान, यावर्षी सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे संकट तुलनेने अधिक तीव्र झाले असून आत्मा व कृषी विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे दैनंदिन रुग्ण शेकडोंच्या संख्येत आढळत आहेत; मात्र त्यास न डगमगता राज्यभरातील ३० सहायक कृषी अधिकारी आंबा उत्पादकांच्या मदतीसाठी पुन्हा एक वेळ सज्ज झाले आहेत. गेल्या काही दिवसांत कोकणातील सुमारे ६०० शेतकऱ्यांची सहा कोटींची आंबा विक्री करून त्याचे पैसे रीतसर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती गव्हाणे यांनी दिली.
.............................
‘व्हॉट्सॲप’द्वारे चळवळ झाली वृद्धिंगत
कोरोनाच्या संकट काळात नियमावलीचे पालन करीत कोकणातील हापूस आंबा विक्रीसाठी ‘कोकण हापूस महोत्सव’ या नावाखाली ३० सहायक कृषी अधिकाऱ्यांसह ३९५ आंबा उत्पादक व राज्यभरातील ग्राहकांचा सहभाग असलेले तीन व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून ही चळवळ अधिक वृद्धिंगत झाली आहे.
....................
वाहतूक बंदमुळे झाले नुकसान
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद आहे. परिणामी, आंब्याची मागणी होऊनही तो संबंधित जिल्ह्यात पाठविण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे; अन्यथा आंबा विक्रीतून आतापर्यंत साधारणत: १५ कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाली असती, असे यशवंत गव्हाणे यांनी सांगितले.
....................
कोट :
कोरोनाच्या संकटामुळे यंदा आंबा विक्री होणार की जागीच सडणार, याची कुठलीच शाश्वती नव्हती; मात्र सहायक कृषी अधिकाऱ्यांनी मोलाची मदत करून आंबा विक्रीस प्रोत्साहन दिले. यशवंत गव्हाणे यांच्या सहकार्यामुळे आंबा विक्री करता आली. तिला दरही तुलनेने चांगला मिळाला.
- चेतन राणे, वरेरी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
..................
दरवर्षी महाराष्ट्रच नव्हे; तर अन्य राज्यांतही कोकणचा हापूस आंबा विक्रीसाठी पाठविला जातो. यावर्षी मात्र कोरोनामुळे मोठे संकट उभे ठाकले होते. अशा वेळी सहायक कृषी अधिकाऱ्यांनी मदतीचा हात देऊन आंबा विक्रीसाठी सहकार्य केल्याने होणारे नुकसान टळले.
- सिद्धेश गडेकर, आडेली, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग