कोटा येथील खुन प्रकरणातील आरोपींना वाशिमच्या दर्ग्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 01:48 PM2020-01-28T13:48:22+5:302020-01-28T13:48:36+5:30
खून प्रकरणातील आरोपींचे कोटा टू वाशिम दर्गा कनेक्शन जुळलेच कसे ? दर्ग्यात त्यांना १४ ते १५ दिवस आश्रय कसा मिळाला आणि तो कुणी दिला? यासह इतरही अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राजस्थान राज्यातील कोटा शहरात एका इसमाचा बंदूकची गोळी मारून खून केल्यानंतर इतरही काही नागरिकांवर फायरिंग करून फरार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ जानेवारीला टिळक उद्यानासमोरच्या मोकळ्या मैदानातील दर्गामधून पिस्तुलासह अटक केली. दरम्यान, खून प्रकरणातील आरोपींचे कोटा टू वाशिम दर्गा कनेक्शन जुळलेच कसे ? दर्ग्यात त्यांना १४ ते १५ दिवस आश्रय कसा मिळाला आणि तो कुणी दिला? यासह इतरही अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.
राजस्थान राज्यातील कोटा शहरात असलेल्या कैथुनीपोल पोलिस स्टेशनअंतर्गत अमन बच्चा नामक इसम व त्याच्या साथीदारांनी एका इसमाची बंदूकची गोळी मारून हत्या केली. यावेळी मध्यस्थी करणाºया इतरही काही इसमांवर त्यांनी फायरिंग करून पोबारा केला. कैथुनीपोल पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला; मात्र सुगावा लागला नाही. यादरम्यान सदर आरोपी वाशिम शहरातील टिळक उद्यानासमोर असलेल्या मोकळ्या मैदानातील दर्गामध्ये लपून असल्याची गोपनिय माहिती कैथुनीपोल पोलिसांना मिळाली. त्याआधारे त्यांनी वाशिम पोलिसांच्या मदतीने शहानिशा केली असता, दर्गामध्येच आरोपी आढळून आले. अमनअली एहसानअली, मो. इसरद शब्बीरखान (दोघेही रा. साजीदयाना, कोटा, राजस्थान), गोलू उर्फ जावेद हुसेन (रा. जलावाड, राजस्थान), मो. उमर मो. चाँद (रा. पुरानी सब्जीमंडी, कोटा, राजस्थान) या चार आरोपींसह मो.सलीम मो.सोफी (रा. डाफणी पुरा, कारंजा लाड, जि.वाशिम) अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली. सदर आरोपी वाशिमच्या दर्गामध्ये गत १४ ते १५ दिवसांपासून तळ ठोकून होते, हे पोलिसांकडूनच कळले.
दरम्यान, वाशिम ते कोटा हे अंतर रेल्वेने १०५७; तर वाहनाने ७०७ किलोमिटर आहे. असे असताना एका इसमाची हत्या करून इतक्या दुरवरून तेथील आरोपी वाशिममधील दर्गामध्ये आश्रयास येतात आणि येथेच १४ ते १५ दिवस तळ ठोकून राहतात, ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. पोलिस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणीही यानिमित्ताने सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
वाशिम पोलिसांची कारवाई कौतुकास्पद!
हत्या प्रकरणातील आरोपी दर्गामध्ये लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी २८ पोलिस कर्मचाºयांचे दोन विशेष पथक तयार करून अत्यंत शिताफीने दर्गामध्ये २४ जानेवारीला धाड टाकली. यावेळी पाचही आरोपींना अटक करून कैथुनीपोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एकाठिकाणी गुन्हा केल्यानंतर आरोपी इतरत्र पळून जाऊन आश्रय घेतात. विशेषत: छोटी शहरे यासाठी निवडली जातात. कोटा शहरातील कैथुनीपोल येथे इसमाची हत्या करून आरोपींनी स्थानिक काही लोकांच्या मदतीने दर्गामध्ये आश्रय घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम