गावोगावी स्थापन होणार ‘कोविड हेल्पलाईन पथक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:14+5:302021-06-04T04:31:14+5:30
दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकानेच खबरदारी घ्यावी, असे आवाहन शासन, प्रशासनातर्फे केले जाते. ...
दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकानेच खबरदारी घ्यावी, असे आवाहन शासन, प्रशासनातर्फे केले जाते. दरम्यान, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच उपाययोजनेचा एक भाग म्हणून यापुढे वाशिमसह राज्यातील ग्रामीण भागात कोविड हेल्पलाईन पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकात गावातील खासगी डॉक्टरसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्यासह स्थानिक कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने डॉक्टरांचे सहाय्य घेऊन चालू करण्यास मदत करणे, रुग्णांची वेळोवेळी तपासणी करणे व आवश्यक तपासण्या नाममात्र दरात करणे, आवश्यकता असलेल्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य रुग्णालयात भरती करणे, रुग्ण अॅडमिट करताना बेडच्या उपलब्धतेबाबत व उपचारादरम्यान औषधांच्या कमतरतेबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत करणे, विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी आणि इतर बाबींचा आढावा घेणे, कोरोनानंतर म्युकरमायकोसिस किंवा अन्य आजारांची लक्षणे आढळून येत आहेत का याची माहिती घेण्याचे काम या पथकातील सदस्यांना करावे लागणार आहे.