वळणमार्गावर गतिरोधकाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:52+5:302021-06-01T04:30:52+5:30
शेलूबाजार -वाशिम मार्गावरील गोगरी ते पिंप्री खुर्द फाट्यादरम्यान धोकादायक वळण आहे. अनेक वाहनांना पलटी होण्यासाठी निमंत्रण देणाऱ्या या ...
शेलूबाजार -वाशिम मार्गावरील गोगरी ते पिंप्री खुर्द फाट्यादरम्यान धोकादायक वळण आहे. अनेक वाहनांना पलटी होण्यासाठी निमंत्रण देणाऱ्या या धोकादायक वळणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना असतानाही नव्याने नूतनीकरणाच्या वेळी पाहिजे त्या प्रमाणावर या वळणाची दुरुस्ती झाली नाही. कठडे लावल्यानंतर अनेक वाहने त्या कठड्याला भेदून अपघातग्रस्त झाली, असे तुटलेल्या कठड्यावरुन दिसून येते. दुसरी बाब म्हणजे चिखली ते पिंप्री अवगण हे ९ किमी अंतर हा सिंगल रस्ता अन् पिंप्री ते वाशिम हा दुहेरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या निर्माती नंतर सदर मार्गावर प्रचंड वाहतूक वाढली आहे. अकोला येथून वाशिम तथा हिंगोली नांदेड जाणारे वाहनधारक याच मार्गाचा अवलंब करत आहेत; परंतु चिखली ते पिंप्री अवगणपर्यंतचा एकेरी रस्ता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या अरुंद रस्त्यावर बाजू घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात रस्त्याच्या कडा भरताना गिट्टीचा वापर करण्यात आला आहे. त्या गिट्टीमुळे वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
..
विद्युतीकरणाचे काम अर्धवट
या रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक गावात सिमेंट रस्ते व दोन्ही बाजूंनी नाल्या आणि विद्युतीकरण करण्यात आले आहे. यामध्ये माळेगाव व पिंप्री अवगण ही दोन गावे आहेत. पिंप्री अवगण येथे गावाच्या हद्दीपर्यंत दोन्ही बाजूंनी नाली व विद्युतीकरण करणे गरजेचे होते; मात्र काही विशिष्ट अंतरापर्यंतच नाल्या व विद्युतीकरण करण्यात आले. काही भागातील लोकवस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने अर्धवट कामाबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.